नवी दिल्ली – देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला कोरोनाच्या लशीचे दोन डोस घेण्याची आवश्यकता नाही. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या लोकांना लशीचा एकच डोस पुरेसा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा लोकांना तीन महिन्यांनंतर डोस दिल्यास त्यांच्या शरिरात कोणताच बदल होत नाही. मेडरेक्सिव मेडिकल नियतकालिकात प्रकाशनापूर्वी समिक्षात्मक सात संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनेसुद्धा हा निष्कर्ष स्वीकारला आहे.
देशातील ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच देशातील निम्म्याहून अधिक लोक कोरोनाच्या दुसर्या लाटेत संक्रमित झाले आहेत. हे लोक काही दिवसांनंतर बरेसुद्धा झाले आहेत, असा निष्कर्ष आयसीएमआरने चौथ्या सिरो सर्व्हेत काढला होता.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव जयजेवन सांगतात, आता आमच्याकडे पुरावे आणि मोठी रुग्णसंख्यासुद्धा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेमध्ये बदल करून लशीचा डोस घेण्यापूर्वी अँटिबॉडीची तपासणी करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. असे केल्यास लसीकरणाचा वेळ आणि खर्च दोन्हीसुद्धा वाचणार आहे.
एक कोवॅक्सिन आणि दोन कोविशिल्ड लशीवर झालेल्या अभ्यासानुसार, या तिन्ही अभ्यासाचे परिणाम एक समान आहेत. ज्या लोकांना आधी कोरोनाचा संसर्ग झाला ते बरे झाल्यानंतर एक डोस परिणामकारक आहे.