नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या लोकांनी अजूनही लस घेतली नाही, अशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लस न घेतलेल्या बाधितांचा मृत्यूदर चार टक्क्यांच्या वर नोंदविला गेला आहे. एकही लस न घेतलेले लोक डेल्टा व्हेरिएंटने बाधित होऊन नंतर त्यांची प्रकृती वेगाने गंभीर होत असल्याचे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे. एक डोस घेणा-या रुग्णांचा १.३४ टक्के असा मृत्यूदर नोंदविला गेला आहे. लशीचे दोन्ही डोस घेणा-या लोकांचा मृत्यूदर शून्य टक्के नोंदविला गेला आहे. म्हणजेच लसीकरण पूर्ण झाल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
आयसीएमआरच्या महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील वैज्ञानिकांनी एक संशोधन केले आहे. डेल्टा व्हेरिएंटने बाधित झालेल्या रुग्णांचा संसर्ग गंभीर रूप धारण करत आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (एनआयव्ही) वैज्ञानिक डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा होणार्या खूपच कमी रुग्णांना रुग्णालयात जावे लागत नाही. तसेच त्यांचा मृत्यूही होत नाही. मेडिकल जर्नल एल्सेविअरमध्ये प्रकाशिक एका अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामारी संस्थेचे प्रमुख डॉ. एम. मुर्हेकर म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटमुळे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेणा-या लोकांमध्ये अँटिबॉडी कमी होत आहेत. पण तरीही लशीचा परिणाम संपत नाही. अँटिबॉडी कमी झाल्यानंतर लसीकरण झालेले लोक बाधित होऊ शकतात, परंतु ते घरीच उपचार घेऊन बरे होऊ शकतात. दरम्यान, कोरोना लसीकरणासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. देशात आता लशीचे संकट पूर्णपणे संपलेले आहे. प्रथमच राज्यांकडे चार कोटींहून अधिक डोस उपलब्ध आहेत.