नवी दिल्ली – कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात भारताला गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. देशात एका दिवसात एक कोटीहून अधिक कोरोना लस घेऊन इतिहास रचला आहे. देशात लसीकरणाला खूपच धिम्या गतीने सुरुवात झाली होती. परंतु आता लसीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता कोरोनाविरुद्धचा लढा लढण्यास कोणतीच कसर सोडली जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. भारताच्या या यशाचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी ट्विट करून भारताचे अभिनंदन केले आहे. त्या सांगतात, भारताने आतापर्यंत ५० टक्के वयस्क नागरिकांना लस दिली आहे. आतापर्यंत देशात कोविडविरोधी लशीचे ६२,१७,०६,८८२ हून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल एक कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे अभिनंदन.
राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समुहाचे (एनटीएजीआय) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा सांगतात, भारताने एका दिवसात एक कोटी डोस देण्याची बाब अभिमानास्पद आहे. तसेच एका दिवसात सव्वा कोटी भारतीयांना लस देण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल. या वर्षीअखेरपर्यंत सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी देशात ३१ डिसेंबरपर्यंत दररोज १ कोटी डोस देणे आवश्यक आहे.
देशात प्रथमच एक कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोविन संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, देशात कोविडविरोधी लशीचे ६२,१७,०६,८८२ हून अधिक डोस देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेशी निगडित सर्व लोकांचे कौतुक केले आहे. तसेच लस घेणार्या नागरिकांचेही अभिनंदन केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, आज विक्रमी लसीकरण झाले आहे. एक कोटी आकडा पार करणे महत्त्वाचे यश आहे.