नवी दिल्ली – या वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण देशात सगळ्या लोकांचे लसीकरण करवून घेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. परंतु भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा तुटवडा या लक्ष्यामध्ये अडथळा ठरण्याची शक्यता आहे. बंगरुळूमधील कंपनीच्या नव्या प्लॅंटमध्ये उत्पादित लशीची गुणवत्ता कमी आढळल्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. ही माहिती टास्कफोर्सचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.
एका खासगी वृत्तवाहीनीशी एन. के. आरोरा बोलत होते. कोवॅक्सिनच्या उत्पादनात गती येण्याची आशा केंद्र सरकारला होती. परंतु कंपनीच्या मोठ्या प्लॅंटमध्ये उत्पादित लशीची गुणवत्ता खराब असल्यामुळे तसे होऊ शकणार नाही. लशीचे उत्पादन रॉकेट सायन्ससारखेच आहे. आम्ही कोवॅक्सिनच्या उत्पादनात गती येण्याची आशा करत होतो. कंपनीने बंगळुरूमध्ये नवा प्लँट सुरू केला आहे. त्याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यासुद्धा एकूण उत्पादन वाढविण्यासाठी एकत्रितरित्या काम करत होत्या.
बंगरुळूमधील प्लँट जगभरातील सर्वात मोठ्या लस उत्पादक प्लँटपैकी एक आहे. परंतु सुरुवातीला काही बॅच गुणवत्तेचे निकष पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु तिसरी आणि चौथी बॅच आता आली आहे. या लशींना देशात पाठविण्यात आले आहे. पुढील चार ते सहा आठवड्यात भारत बायोटेकच्या लशीचे उत्पादन वाढेल अशी आशा आहे. गुणवत्तेचे निकष पूर्ण न करू शकणा-या लशींचा वापर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताला सध्या लसीकरणासाठी प्रत्येक महिन्यात ३० कोटी डोसची गरज आहे. याचाच अर्थ भारत बायोटेकला लशीचे उत्पादन एक किंवा दोन कोटींवरून वाढवून दहा कोटी करावी लागणार आहे. ही मोठे आव्हान आहे. आगामी काळात लशीचे उत्पादन काही पटीने वाढण्याची शक्यता आहे, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.