इंग्लंड – गेल्या जवळपास दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी दोन हात करत आहे. कोरोनावर लशीचे संशोधन झाले असले तरी कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत असल्याने ती माणसाला शंभर टक्के सुरक्षित ठेवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर माणसाला कोरोनाची बाधा होऊ शकते. फक्त माणसाचा मृत्यू होत नाही हाच काय तो लशीचा परिणाम आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर निष्काळजीपणे वागून चालणार नाही. विशेषतः कार्यालये, कामाच्या ठिकाणांवर जिथे जास्त वेळ अनेक लोक एकत्र असतात. तिथे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लशीचे दोन्ही डोस घेणार्या नागरिकांना कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट आपल्या कवेत पुन्हा घेऊ शकतो. इतकेच नाही, तर इतरांनाही बाधित करू शकतो, असा निष्कर्ष नव्या संशोधनात काढण्यात आला आहे. या संशोधनाचा तपशील लॅसेंट या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, लस न घेणार्यांच्या तुलनेत लस घेणार्या नागरिकांपासून संसर्ग फैलावण्याचा दर कमी असतो. तसेच लस घेणार्यांना गंभीर संसर्ग होत नाही.
लस घेणारे तसेच घरात राहणारे नागरिक बाधित होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र या संशोधनाच्या निष्कर्षातून या प्रश्नांचीही उत्तरे मिळत आहेत. ब्रिटनमधील इंपिरिअल कॉलेज ऑफ लंडनतर्फे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लस घेणार्या आणि लस न घेणार्या नागरिकांमधील संसर्गाचे प्रमाण जवळपास सारखेच असते. परंतु लस घेणार्या व्यक्तीचा संसर्ग वेगाने कमी होतो. तसेच तो लवकर बरा होतो. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देताना लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे दिसून आले आहे.
महामारीला रोखण्यासाठी लसीकरण खूपच महत्त्वाचे आहे. लशीमुळे कोरोना संसर्गाचा गंभीर धोका आणि मृत्यू टाळता येतात हे सिद्ध झाले आहे, असे इंपिरिअल कॉलेज ऑफ लंडनचे प्राध्यापक तसेच संशोधनातील सहसंशोधक अजित ललवानी यांनी सांगितले. कोरोनापासून बचावासाठी फक्त लस घेणे उपयोगाचे नाही. त्यासाठी कोरोना प्रतिबंधाचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी सर्वप्रथम लस घेणे गरजेचे आहे, असेही ललवानी यांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन गेल्या वर्षी सप्टेंबर ते या वर्षी सप्टेंबर महिन्यादरम्यान करण्यात आले. यामध्ये ६२१ नागरिकांचा समावेश होता.