कोची – कोरोनाविरोधातील लढाईदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. खासगी क्षेत्रात लशीचा पहिला डोस घेतल्याच्या २८ दिवसांनंतर कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला जाऊ शकतो. परंतु ही कालमर्यादा सरकारतर्फे मोफत लस देण्यात येणा-या लशींवर लागू नसेल, असा महत्त्वाचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. परदेशात बैठकांसाठी जाणारे अधिकारी आणि शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या लशीच्या दोन डोसमधील ८४ दिवसांच्या अंतरात सवलत देण्यात आली आहे. कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कोविशिल्डच्या दुस-या डोसला विलंब करणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कंपन्यांच्या किटेक्स समुहाने गेल्या महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, कंपनीने कर्माचा-यांसाठी लशीचे दोन्ही डोस खरेदी केले आहेत. परंतु सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर दिला जावा. त्यामुळे खरेदी केलेली लस खराब होऊन वाया जाऊ शकते, असा दावा कंपनीने याचिकेत केला होता. किटेक्स समुहाने या नियमांना विरोध केला. तर केंद्र सरकारने याचिकेतील दाव्यांना खोडण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने केंद्रांच्या आक्षेपांना फेटाळून लावले. अधिकारी आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांनासुद्धा लशीचे दोन्ही डोस देण्यास विलंब केला जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले. परंतु का निर्णय २८ दिवसांच्या कालमर्यादेबाबत देण्यात आला आहे. सरकारकडून देण्यात येणा-या मोफत लशीच्या डोससाठी हा निर्णय लागू नसेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.