नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना १ मेपासून आता खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये देऊन लस घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरूच राहील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी १ मे पासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणाबाबत माहिती दिली. दरम्यान, १ मे पासूनच्या लसीकरणासाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे.
लस बनवणाऱ्या कंपन्या आपल्या उत्पादनाच्या ५० टक्के लस राज्य आणि रुग्णालयांना देणार आहेत. लसीच्या किमती त्यांनी आधीच घोषित कराव्या लागणार आहेत. त्याच आधारावर खासगी रुग्णालये लशींची किंमत ठरवतील. १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी त्या त्या राज्यांना लस खरेदी कराव्या लागणार आहेत. किंवा खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करता येणार आहे, असे भूषण यांनी सांगितले.
दुकानात लस नाही
औषधांच्या दुकानातून लस खरेदी करता येणार नाही. जे रुग्णालय कोरोना लसीकरणाचे नियम पाळून लस देत आहेत, अशांनाच लशीचा पुरवठा करण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये लशीमुळे दुष्परिणाम झाल्यास उपचाराच्या सुविधाही ठेवाव्या लागणार आहेत.
कोविनवर नोंदणी आवश्यक
१८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी कोविन अॅपवर २४ एप्रिलपासून नोंदणी करता येणार आहे. कुठेही लसीकरण केले तरी नोंदणी गरजेची आहे. आधी नोंदणी करून लस घेऊ शकता येईल किंवा संबंधित ठिकाणीही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.
दुसर्या डोसला प्राधान्य
ज्या लोकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ठरलेल्या वेळेत दुसरा डोस देण्यास प्राधान्य द्यावे लागेल. सर्व प्रकराच्या लशीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. जर कोणतीही कंपनी परदेशातून लस आयात करत असेल तर त्यासाठी केंद्र सरकारला पुरवठा करणे बंधनकारक नसेल.लस राज्य सरकारला विक्री करायची आहे की रुग्णालयांना हे तिच्यावर अवलंबून असेल.
https://twitter.com/CovidIndiaSeva/status/1385113709731741697