कोलकाता – पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन २४ लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाल्याने दरवाजे उघडल्यानंतर लोकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही घटना घडली. आठ जणांना जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात आणि बिरपारा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकी लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षदर्शी भवानी रॉय म्हणाले, तिनशेहून अधिक लोक शाळेच्या बाहेर वाट पाहात होते. पोलिस आणि स्थानिक पंचायतीच्या लोकांनी गेट उघडल्यावर गर्दी आतमध्ये आली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
शाळेच्या अधिकार्यांना शिबिराबाबत काहीच माहिती नव्हते. संवादाचा अभाव असल्यामुळे ही घटना घडली असावी. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे, असे जलपाईगुडीचे पोलिस अधीक्षक देबार्शी दत्ता यांनी सांगितले. जिल्हा न्यायदंडाधिकारी मौमिता गोदारा बसू म्हणाले, बनरहाटच्या विभागीय विकास अदिकार्यांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठवून बुधवारी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.