वि. वि. करमरकर –
मराठी क्रीडा पत्रकारितेचा डॉन ब्रॅडमन
११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे जन्मलेले आणि येथेच शालेय आणि कॉलेज शिक्षण पूर्ण केलेले ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थी श्रेष्ठ मराठी क्रीडा पत्रकार विष्णू विश्वनाथ ऊर्फ वि वि करमरकर यांना देवाज्ञा झाली आणि मराठी क्रीडा पत्रकारिता अक्षरशः पोरकी झाली कारण त्यांच्या तोडीचा आणि दर्जाचा मराठी क्रीडा पत्रकार एकही नव्हता आणि पुढेही ( अगदी आजपर्यंत ) तयार झाला नाही ! हेच त्यांचे वेगळेपण आणि मोठेपण!
ते विविक या नावाने अनेकवेळा लिहीत विशेषतः सदर लेखन करीत आणि ते गूगल- पूर्व काळात इतके अभ्यासपूर्ण असे की त्यांनी इतकी सविस्तर आणि अचूक माहिती कोठून मिळविली असा प्रश्न पडे! उदाहरण ध्यायचे तर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जात तेव्हां ते रोज ‘ दूरवरुन दृष्टीक्षेप’ नावाचे अप्रतिम सदर लिहित, त्यात ते सामन्याच्या वर्णना व्यतिरिक्त तेथील हवामान , मैदानाची वैशिष्ट्य, तेथील जुन्या नव्या खेळाडूचा परीचय, त्यांच्या सवयी तसेच लकबी शिवाय त्यांचे वजन , उंची इ बाबत इतकी परिपूर्ण आणि रसभरित माहिती देत की आपले ज्ञान तर वाढेच पण काहीतरी उत्तम, दर्जेदार आणि नवीन वाचल्याचा आनंद मिळे! आणि हे सदर ते भारतात बसून इंग्लंडला न जाता लिहित हे विशेष! नाशिकला क्रीडा पत्रकारितेचा श्रीगणेशा त्यांनी रसरंग आणि गावकरीतून केल्यावर ते मुम्बई येथे स्थायिक झाले आणि १९६२ साली सुरु झालेल्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये ते पहिले क्रीडा संपादक झाले ! अशा रितीने मराठी वर्तमान पत्रात क्रीडा संपादक होणारे, क्रीडा विषयक बातम्यासाठी एक संपूर्ण पान सुरु करायला संपादकांना आपल्या कर्तृत्वाने भाग पाडणारे विविक हे पहिले क्रीडा पत्रकार!
त्याचप्रमाणे संपादकां बरोबर वाद विवाद करून (भांडण नव्हे) आणि संपादकांना समर्पकरित्या पटवून देउन इंग्रजी पेपरच्या क्रीडा पत्रकारां सारखे भारतभर प्रत्यक्ष सामन्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करणारे विविक हे पहिलेच ! सुदैवाने त्यांना द्वा भ कर्णिक आणि गोविंद तळवलकर यांच्यासारखे जाणकार संपादक लाभले हे नशीब. विविक यांचे आणखी वेगळेपण म्हणजे रेडिओ आणि दूरदर्शनवर मराठीत समालोचन करणारेही ते पहिलेच . १९६९-७० साली भारत वि ऑस्ट्रेलिया मुम्बई सामन्याचे त्यांनी बाळ पंडित यांच्यासह प्रथम समालोचन केले ! हे करताना सोपे आणि सहज तोंडी बसतील असे मराठी प्रतिशब्द (उदा : धावफलक, धावसंख्या, यष्टीचीत इ) ते आवर्जून वापरीत.
क्रिकेटसह ते खो- खो, कबड्डी आणि कुस्ती सामन्याचेही उत्तम समालोचन करीत ! मुख्य म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट असे समजणाऱ्या वाचकांना त्यांनी खो खो , कबड्डी आणि कुस्ती या भारतीय खेळांबद्दल उत्कृष्ट वृत्तांकन करून आकर्षित केले ! आपल्या क्रीडा पानावर गावस्कर इतकेच महत्त्व आणि स्थान ते गणपत आंदळकर वा मारुती माने ( कुस्ती ). ऱाजु द्रविड वा श्रीरंग इनामदार ( खो खो ) मधु पाटील वा क्रान्ति किंवा चित्रा नाबर भगिनी ( कबड्डी) इत्यादीना देत . थोडक्यात म्हणजे भारतीय खेळामधील खेळाडूना मोठे करण्यात विविकं चा मोठा वाटा आहे हे नि:संशय. बातमीला अतिशय समर्पक आणि वेधक शीर्षक किंवा हेडींग देण्यात तसेच बातमी वाचनीय करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही !
हे उदाहरण बघा
१९८३ साली भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकून आणि तेही वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाला हरवून एका धक्कादायक निकालाची नोंद केली . त्यानंतर हाच विंडीज संघ पाच कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला तेंव्हा विविकं चे हेडींग होते
” विश्वचषक विजेते विरूध्द विश्वविजेते !”
विविक फक्त क्रीडा पत्रकार नव्हते तर ते समाजवादी विचाराचे जबाबदार नागरिक या भावनेने पत्रकारिता करीत असल्याने क्रीडा क्षेत्रात त्यांना अन्याय दिसला की त्यांच्या लेखणीला तलवारीची धार येई त्यामुळे बालेवाडीत क्रीडासंकुलाचा पांढरा हत्ती उभा करणारे सुरेश कलमाडी असो , खो खो ला जागतिक स्पर्धेची खोटी स्वप्ने दाखविणारे मुकुंद आंबर्डेकर असो किंवा वर्षानुवर्षे खुर्च्या अडवून बसणारे निष्क्रिय मामासाहेब मोहोळ असो , किंवा शिव छत्रपती पुरस्कारातील विसंगती असो, विविकं नी आपली धारदार लेखणी कुणालाही न भिता आणि परिणामाची तमा न बाळगता तलवारीसारखी चालवली.
क्रीडा पत्रकारितेचा पाया रचणारे आणि कळसही तेच असलेले विविकचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अनेकांनी क्रीडा पत्रकारिता केली पण त्यांची सर अजूनही कुणाला आलेली नाही हे कटू सत्य आहे. विविकं पूर्वी भा रा धुरंधर, र गो सरदेसाई तसेच नंतर वसंत भालेकर, चंद्रशेखर संत इ पत्रकार झाले पण विविकचे क्रीडा प्रेमीच्या हृदयातील स्थान इतर कुणाला काबीज करता आले नाही. नाशिकचे भूमीपुत्र विविक इतके मोठे यश मिळवूनही नाशिकच्या क्रीडा क्षेत्राशी त्यांनी आपली नाळ अखेरपर्यंत जुळवून ठेवली होती त्यामुळे नाशिकमधील क्रीडा पत्रकार, संघटक आणि खेळाडू यांच्या ते अखेर पर्यंत संपर्क ठेवून असत.
V V Karmarkar Sports Editor Article by Dipak Odhekar