इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लवकरच लागू होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. आपल्या पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पहाडी राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. मात्र धामी यांना खतिमा जागेवरून पराभवाला सामोरे जावे लागले.
एका कार्यक्रमादरम्यान धामी म्हणाले की, ‘आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करू. तसेच आम्ही राज्यात समान नागरी कायदा लागू करू. 1064 अँटी करप्शन मोबाईल अॅप देखील सुरू केले आहे जेथे नागरिक तक्रार करू शकता आणि दोषींना कठोर कारवाई केली जाईल. यापुर्वी भाजप नेत्याने म्हटले होते की समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असेल.
मार्चमध्ये, राज्य सरकारने समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ पॅनेल स्थापन करण्याची घोषणा केली होती. उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सीएम धामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहितेचा उल्लेख होता.
दरम्यान, दि.10 मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर धामी म्हणाले होते, “आम्ही निवडणुकीपूर्वी समान नागरी संहितेचे आश्वासन दिले होते की आमचे सरकार त्याची अंमलबजावणी करेल.” शपथविधी समारंभानंतर आम्ही संबंधितांची उच्चस्तरीय समिती स्थापन करू. समिती मसुदा तयार करेल, त्याची अंमलबजावणी आम्ही करू. याशिवाय इतर सर्व आश्वासनांची पूर्तता करू.
समान नागरी संहिता हा नागरिकांचे वैयक्तिक कायदे बनवण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे, जो धर्म, लिंग यांचा विचार न करता सर्व नागरिकांना समानपणे लागू होतो. सध्या देशातील विविध समुदायांचे वैयक्तिक कायदे धार्मिक ग्रंथांच्या आधारे चालतात.