नवी दिल्ली – कोरोना महामारीने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यानंतरही राजकीय नेते आणि प्रशासन सुधरण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याऐवजी काही कर्मचारी माणुसकीला न शोभणारे वर्तन करीत आहेत. डेहराडूनमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी तत्काळ कोरोना किट उपलब्ध करण्याऐवजी आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना किटवर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्या फोटोवर नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फोटोचे स्टिकर चिकटवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर किट उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
डेहराडूनमध्ये मुख्य आरोग्य अधिकार्यांच्या कार्यालयात जवळपास २४ आंगणवाडीसेविकांना माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्या फोटोवर नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फोटोचे स्टिकर लावण्याचे काम देण्यात आले आहे. आरोग्य अधिकार्यांनी आत जाण्यास मज्जाव केल्याचे सांगत तिथल्या सुरक्षारक्षकाने माध्यम प्रतिनिधींना रोखले. आरोग्य अधिकार्यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
डेहराडूनमधील विलगीकरणात असलेल्या कोरोनारुग्णांना संबंधित किट दोन ते तीन दिवसांनंतर मिळत आहे. किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांचे स्टिकर लावण्याचे काम सुरू असल्याने ते वाटप करण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु काही जुन्या किट शिल्लक असतील त्यावर माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो असतील. फोटो बदलण्याबाबत काहीच माहिती नाही. नव्या किट आल्या असून त्या वेगाने वाटप केल्या जात आहे, असे स्पष्टीकरण शहरातील किट वितरणाचे प्रभारी डॉ. आनंद शुक्ला यांनी सांगितले.