इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीवर चढून बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडली असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, बहुगुणा यांच्या सुनेने आरोप केला आहे की बहुगुणा यांनी नातीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेही ते सध्या चर्चेत आले होते.
त्यातच बहुगुणा यांच्या शेजारी सविता नामक महिला राहते. सविताने तक्रार दिली होती की, बहुगुणा यांनी मला व सासूला शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केली. याप्रकरणीही बहुगुणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे त्यांच्यावर हे २ गुन्हे दाखल आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणाने पोलिसांना फोन करून बोलावले आणि नंतर पिस्तुलाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना टाकीवरून खाली उतारण्यास सांगितले. पण नंतर अचानक त्यांनी बंदूक काढली आणि छातीत गोळी झाडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण ते मरण पावले होते. बहुगुणा यांच्या आत्महत्येची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंड मध्ये २००२ मध्ये जे पहिले सरकार स्थापन झाले होते त्यावेळी ते मंत्री होते.