मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भाजपने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविले आहे. तसेच उत्तराखंडच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे की, राज्यात सलग दुसऱ्यांदा कोणताही पक्ष सरकार स्थापन करेल. मात्र विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी निराशा केली आहे. धामी यांना खतिमा विधानसभा मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचा काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी 6000 हून अधिक मतांनी पराभव केला. यामुळे आता पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री बदलला जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या १२ महिन्यात भाजपवर चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधण्याची वेळ आली आहे.
भुवनचंद कापरी हे उत्तराखंडचे युवा नेते आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले भुवनचंद कापरी हे उत्तराखंड युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी उत्तराखंड प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदही भूषवले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुष्करसिंग धामी यांना कडवी झुंज दिली परंतु त्यांचा केवळ 2709 मतांनी पराभव झाला. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत खतिमा येथे यापूर्वी प्रस्तावित केलेली कामे जलदगतीने पूर्ण करून घेतली, तसेच नवीन कामेही प्रस्तावित केली. पण हे काम 2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख पाच कामांमध्ये चाकरपूर येथील स्टेडियमची पायाभरणी, माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य विद्यालय, एनएच 125 बायपास रोडचे बांधकाम, रोडवेज बस स्थानकाचे उद्घाटन यांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील रस्ता बांधणे, शहराचे सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
२०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविले. त्यावेळी त्रिवेंद्र सिंह रावत हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ४८ महिने रावतांनी पदभार सांभाळला. त्यानंतर खासदार तीरथ सिंह यांना मुख्यमंत्री बनविण्यात आली. ते ११६ दिवस पदावर राहिले. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पुष्कर सिंह धामी यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले. आता धामी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आता चौथीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदासाठी शोधावी लागणार आहे.
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत झालेल्या चार विधानसभा निवडणुकांचा इतिहास दोन दशकांचा आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप आळीपाळीने सत्तेत आहेत, पण एकाही पक्षाला सलग दुसऱ्यांदा खुर्ची जिंकता आलेली नाही. 2002 च्या निवडणुकीत काँग्रेसने आणि 2007 मध्ये भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर 2012 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि 2017 मध्ये पुन्हा भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. आता 2022 मध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.