पिथौरागड (उत्तराखंड) – येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले. धारचुलाच्या जुम्मा गावातील जामुनी तोकमध्ये जवळपास पाच तर सिरौडयार तोकमध्ये दोन रहिवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. तसेच सात लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. आशिष चौहान म्हणाले, रात्री उशिरा जुम्मा गावात अतिवृष्टी होऊन सात लोक मातीच्या ढिगार्याखाली दबले गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महसूल अधिकारी, पोलिस, एसडीआरएफ आणि बचाव पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले. एनडीआरएफचे पथकही पाठविण्यात आले आहे. पथकाने गावातून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन घटनास्थळी मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साहित्य पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जिल्हाधिकारी चौहान यांना फोनवर बोलून गावातील नुकसानीची माहिती घेतली. प्रभावित भागात तत्काळ सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.