इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नानंतरचे दिवस हे मोरपंखी दिवस असतात. अगदी पंख लावल्यासारखे हे दिवस सरतात. त्यातही लग्नानंतरची पहिली रात्र अर्थात मधुचंद्राच्या रात्रीला तर विशेष महत्त्व असते. मात्र, नेमक्या याच दिवशी जर बायकोने नवऱ्याला मारले तर, ऐकायला कसं वाटेल? ऐकायला विचित्र वाटत असलेली गोष्ट एका नवऱ्याच्या बाबतीत प्रत्यक्षात घडली आहे. उत्तर प्रदेशात घडलेली ही घटना आहे.
काय आहे प्रकरण?
हमीरपूर जिल्ह्यातील सुरेश कुमार याचे लग्न इमिलिया गावातील मुलीशी झाले. पण, नवरी असलेली संगीता या लग्नामुळे खुश नव्हती. मुलीच्या पालकांनी तिचे जबरदस्तीने लग्न लावले. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांनी नवऱ्याकडील सर्व पाहुणेमंडळींचे आदरतिथ्य केले. स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वाधू – वराने सात फेरे घेतले. लग्नानंतर वधूचा निरोप समारंभ पार पडला. सासरी येताच वराच्या घरी पूजा करून इतर विधी पूर्ण करण्यात आले. मात्र, मनाविरुद्ध लग्न झालेली तरुणी संतापलेली होती. हाच सगळा राग तिने वराच्या खोलीत गेल्यावर काढला. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वराने वधूच्या डोक्यावरील पदर काढताच तिला राग आला, तिने हनिमूनच्या बेडवर वराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात वराला दुखापत झाली. वधूचे हे रूप पाहून नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने घरच्यांना घटनेची माहिती दिली.
दोन्हीकडचे हमरातुमरीवर
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे ही घटना घडली आहे. लग्नाच्या मांडवात सगळे विधी उरकून हे जोडपं घरी गेलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवरीच्या डोक्यावरील पदर काढला त्यामुळे नवरीने संतापून पतीच्या थेट कानशिलात लगावली. नवरीने नवऱ्याला केलेल्या या मारहाणीमुळे कुटुंबाला धक्का बसला. नवरीकडून झालेल्या मारहाणीमुळे नवरा आणि त्याच्या कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून समझौता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्हीकडच्या लोकांना काहीच ऐकायचे नव्हते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
कौटुंबिक न्यायालयात प्रकरण
कुरारा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी सांगितले की, लग्नानंतर सासरी आलेल्या नववधूने वराला बेदम मारहाण केल्याची घटना आम्हाला मिळाली. आम्ही दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि घटनेची चौकशी करून दोघांनाही समजावून सांगण्यात आले, परंतु कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वधू आणि वरांना घरगुती प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Uttar Pradesh Wedding Night Hamirpur