मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागत आहेत. अपेक्षेप्रमाणे उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्टर’ पुन्हा एकदा चालला हे सिद्ध झाले आहे, परंतु उत्तर प्रदेशातील या निवडणुकीकडे सर्वात जास्त चर्चा झाली, ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदारांना दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची. मतदारांना गॅस सिलेंडर पासून ते स्कुटी पर्यंत फुकट वस्तू वाटणार अशा घोषणा झाल्याने त्याची खूपच चर्चा रंगली होती. आताही आश्वासने योगी पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा यूपीमध्ये सरकार स्थापन करणार आहे. सपापेक्षा भाजपने मोठी आघाडी मिळवली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि सपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने दिली होती. दोन्ही पक्षांनी अनेक मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. भाजपची विजयाकडे वाटचाल स्पष्टपणे दिसून येत आहे, मात्र भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोठ मोठी आश्वासने दिली आहेत, ती भाजपला आता पूर्ण करावी लागतील. मात्र मुख्यमंत्री योगी सरकार ही आश्वासने खरच करणार का? हाच खरा प्रश्न आहे.
मोफत वीज: भाजपने पाच वर्षे सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भाजपने सरकार आल्यास 14 दिवसांत उसाचे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले आहे. विलंब झाल्यास व्याज दिले जाईल.
पेन्शन वाढ: भाजपने विधवा आणि निराधार महिलांना मिळणारे पेन्शन 1500 रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पेन्शन दरमहा एक हजार रुपये देण्यात येत होती.
लग्नासाठी मदत: मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत आर्थिक मदत 15 हजारांवरून 25 हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मोफत सिलेंडर: पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवशी 2 मोफत LPG सिलिंडर प्रदान करतील.
मोफत प्रवास: 60 वर्षांवरील महिलांना सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.
मोफत स्कूटी: राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
रोजगार: 5 वर्षांत 3 कोटींहून अधिक नोकऱ्या देण्याचा दावा करत भाजप येत्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबाला किमान एक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी देणार आहे.
मोफत प्रशिक्षण : अभ्युदय योजनेंतर्गत UPSC, UPPSC, NDA, CDS, JEE, NIIT, TET, CLAT आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत कोचिंग सुविधा दिली जाईल.
स्मार्टफोन व टॅब्लेट: स्वामी विवेकानंद युवा शक्तीकरण योजनेंतर्गत 2 कोटी टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वाटप केले जाणार आहे.