इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य तर नक्कीच वाटलं असेल. बहीण आणि नवऱ्याचं अफेअर असेल, ते बायकोला कळलं आणि म्हणून तिने मोठेपणा घेत कदाचित हे लग्न लावून दिलं असेल, असाही अंदाज तुम्ही बांधला असेल. पण, तुमचे हे सगळे अंदाज चुकीचे आहेत. आपल्या बहिणीचे लग्न अगदी थाटामाटाने व्हावे या इच्छेतून या बायकोने बहिणीसोबत हे लग्न लावून दिले. ऐकून नवल वाटलं असेल ना, पण होय हे खरे आहे. हे लग्न सध्या सोशल मीडियावरही गाजते आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील शंकरगड परिसरात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या लग्नाला कुणाचाही विरोध नव्हता. या लग्नाला मुलीकडील सर्व मंडळी उपस्थित होते. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. राजकुमार असं या विवाहित तरुणाचं नाव असून तो प्रयागराजमधील शंकरगड परिसरातील स्थानिक आहे. राजकुमार हा मजुरी करत पोट भरतो. त्याचं लग्न रुमी नावाच्या तरुणीशी झालं होतं. रुमीचा आपल्या बहिणीवर खूप जीव आहे. मात्र घरी हलाखीची परिस्थिती असल्याने बहिणीचे लाड पुरवणे शक्य नव्हते.
बहिणीचं लग्नही थाटामाटात व्हावं अशी तिची इच्छा होती. मात्र, परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. बहिणीचं लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. यावर उपाय म्हणून रुमीने आपल्या लहान बहिणीचं लग्न पतीसोबत लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या लग्नाला नवऱ्याला तयार करणे हा फार मोठा टास्क रुमीसमोर होता. त्याला कसंबसं तयार करून हे तिघेही मंदिरात पोहोचले. दोघांकडील मंडळी सुद्धा मंदिरात पोहोचले. आणि बायकोनेच आपल्या बहिणीचं लग्न आपल्या नवऱ्याशी लावून दिलं. लग्नानंतर दोन्ही बायकांना घेऊन राजकुमार घरी आला. या लग्नाने राजकुमारची पहिली बायको जाम खूश आहे. गावातच नव्हे तर अख्ख्या देशात या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे.