इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपकांच्या कारवाईसाठी अल्टिमेटम दिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना तिकडे उत्तर प्रदेशमध्ये नियम तोडणाऱ्या ध्वनिक्षेपकांविरुद्ध योगी सरकारची कारवाई सुरूच आहे. उत्तर प्रदेशात एका आठवड्यात जवळपास ५४ हजार ध्वनिक्षेपक हटविण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यात झालेल्या कारवाईदरम्यान ध्वनिक्षेपकांच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळले होते. तसेच पोलिसांनी अनेक ध्वनिक्षेपकांचा आवाजही कमी केला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांवरून राज्यात ध्वनिक्षेपकांविरुद्ध कारवाई सुरूच आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवरून ५४ हजार ध्वनिक्षेपक उतरवण्यात आले आहेत. तसेच ६० हजार २९५ ध्वनिक्षेपकांचे आवाज कमी करण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकांविरुद्धची कारवाई अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.
ते म्हणाले, की ध्वनिक्षेपकांविरुद्ध कारवाई करताना पोलिसांकडून कोणावरही छळ किंवा अन्याय होणार नाही हे आम्ही सुनिश्चित केले आहे. कोणताही भेदभाव न करता धार्मिक स्थळांवरून ध्वनिक्षेपक हटविण्यात येणार आहे. नियमांनुसार जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय लावलेले किंवा मंजुरीपेक्षा जास्त लावलेले ध्वनिक्षेपक हटवण्यात येत आहेत.
कुमार म्हणाले, की धार्मिक स्थळांवर एकच ध्वनिक्षेपक लावला जाईल. मंदिर असो किंवा मशीद. धार्मिक स्थळ मोठे असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानंतर एकापेक्षा अधिक ध्वनिक्षेपक लावले जाऊ शकतात. उच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊनच कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. ३ मे रोजी ईदपर्यंत वाट पाहू, परंतु कोणताही फरक पडला नाही, ४ मेपासून मशिदींच्या बाहेर हनुमानचालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यापूर्वी ध्वनिक्षेपकांवरील कारवाईच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले आहे.