नवी दिल्ली – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड नंतर आता उत्तर प्रदेशात महापूरामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गंगा-यमुना धोक्याच्या बाहेर वाहत आहेत. सुमारे चोवीस जिल्ह्यातील हजारो गावांना या पुराचा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
रविवारपासून उत्तर प्रदेशात पुराचा कहर सुरूच आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमधील ११७१ गावे महापुराच्या कचाट्यात सापडली आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन आयुक्त रणवीर प्रसाद यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पूरात अडकलेल्या सर्व लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे आणि कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शासकीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिर्झापूर, प्रयागराज, जालौन, बांदा, हमीरपूर, बलिया, वाराणसी, इटावा, कौशाम्बी, बांदा, कानपूर या शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. तसेच फारुखाबाद, चित्रकूट, आग्रा, चंदौली, गाझीपूर, बहराइच, गोरखपूर, सीतापूर, खेरी, शाहजहांपूर, गोंडा, अयोध्या आणि फतेहपूर ही काही गावेही या पुराच्या विळख्यात आहेत.
एकीकडे गंगा नदीने कचलाब्रिज (बदायुं), फाफामाऊ (प्रयागराज), प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, गाझीपूर आणि बलिया या गावांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे कल्पी (जालौन), हमीरपूर, चिलाघाट (बांदा), नैनी (प्रयागराज) येथे यमुना नदी देखील धोक्याच्या पातळीच्या (चिन्हाच्या ) वर वाहत आहे.
राज्यभरात १२२८ पूरग्रस्त क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ७० हजार लंच पॅकेट्स पूरग्रस्तांमध्ये वाटण्यात आले. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १९९२ बोटी तैनात करण्यात आल्या असून त्यांना गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. त्याचप्रमाणे बचाव आणि मदतकार्यांसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीएसीची टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या राज्यातील ४३ जिल्ह्यांमध्ये एकूण ५९ ठिकाणी बचाव कार्य सुरू आहेत.