इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील पाच राज्यांमध्ये सध्या निवडणूक सुरू आहे. याच अंतर्गत उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. यावेळी एक मोठा गैरप्रकार घडला. लखीमपूर सदर विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू झाल्यानंतर सुमारे तासभराने एका खोडसाळपणा उघडकीस आला. एका मतदाराने मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) एका बटणामध्ये चक्क फेविक्विक टाकले. त्यामुळे ते बटण दाबले जात नसल्याने मतदार नाराज झाले. या गैरप्रकाराची माहिती बीएलओमार्फत अधिकाऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने मतदान यंत्र बदलले आणि सुमारे १५ मिनिटांनी पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार, एका तोतया मतदाराने सायकल चिन्हाच्या बटणावर फेविक्विक लावले होते. लखीमपूर विधानसभा मतदारसंघातील कादीपूर सानी मतदान केंद्रावर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
येथील जिल्हाधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, ही बाब निदर्शनास येताच ईव्हीएममध्ये तात्काळ बदल करण्यात आले असून तेथे पुन्हा मतदान सुरू झाले आहे. तसेच संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात २.१३ कोटी मतदार ६२४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या टप्प्यातील मतदानासाठी ९१ महिला उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात १६ जागा राखीव आहेत. मतदान निष्पक्ष आणि शांततेत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. या जागांवर २०१७ मध्ये ६२.५५ टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथे मतदान होत आहे.