इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दोन मैत्रिणींमध्ये समलैंगिक संबंध होते. दोघींनाही हे संबंध मान्य होते, पण एकीला हे नाते लग्नात रूपांतर करण्याची इच्छा होती. दुसरी मात्र लग्नासाठी तयार नव्हती. तिचे लग्न ठरले होते. मात्र नवरदेवाला तिच्या समलैंगिक संबंधांविषयी कळल्यानंतर लग्न मोडले. त्यातून असा काही प्रकार घडला की साऱ्या देशाचे लक्ष वेधले गेले आहे.
उत्तर प्रदेश विचित्र घटनांसाठी ओळखले जाणारे राज्य आहे. येथील शहाजहानपूरमध्ये पुनम आणि प्रिती या दोघी छान मैत्रिणी होत्या. मैत्रिचे रुपांतर प्रेमात होत गेले आणि पुढे हे बंध समलैंगिक संबंधांमध्ये कसे रुपांतरित झाले हे दोघांनाही कळले नाही. या नात्याकडे प्रिती पूर्णपणे प्रॅक्टीकल नजरेतून बघत होती. तर पुनम फार भावूक होती. ती वाहवत गेली. शक्य नसलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरविण्याचा हट्ट करू लागली. प्रितीकडे तिने लग्नासाठी हट्ट धरला. प्रिती थेट नकार देऊ शकत नव्हती आणि मान्यही करू शकत नव्हती. पण, प्रितीच्या आईने हे प्रकरण मनावर घेतले.
तिला प्रचंड राग आला होता. कारण तिच्या मुलीचे लग्न तुटलेले होते. त्यामुळे तिने कट रचला आणि पुनमला प्रितीच्या मार्गातून हटविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने एका तांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला पुनमला दिला. तो तांत्रिक लिंग बदलून देईल व तुला मुलगा करेल. जेणेकरून तुझे आणि माझ्या मुलीचे लग्न लावून देता येईल. पुनमला हे सारे खरे वाटले. ती प्रिती सोबत जंगलात एका तांत्रिकाकडे गेली. त्या तांत्रिकाने पुढच्या वेळी पुनमला एकटीला बोलावले आणि तिचा खून केला. पुनमच्या भावाच्या तक्रारीवरून तांत्रिक, प्रिती व तिच्या आईला अटक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांनंतर सांगाडा
१८ एप्रिलला पुनम घरातून निघाली होती. त्यानंतर ती घरीच परतली नाही, त्यामुळे पूनमच्या भावाने २६ एप्रिलला पोलिसांत तक्रार दिली. पुढे पोलिसांनी शोध घेतला. दोन महिन्यांनंतर १८ जूनला जंगलात एक सांगाडा सापडला. पुनमच्या भावाने कपड्यांवरून तिची ओळख पटवली.
तांत्रिक नव्हे गवंडी
ज्या तांत्रिकाकडे पुनमला पाठविण्यात आले होते, तो तांत्रिक नसून मुळात गवंडी असल्याचे पोलिसांना तपासात माहिती पडले. तांत्रिक म्हणून तो लोकांची फसवणुक करायचा आणि त्यांना लुटायचा. यापूर्वीही त्याने काही गुन्हे केले आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.