इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात सत्ताधारी भाजप पक्षाकडून जातीयवादी तथा धार्मिक द्वेष पसरविला जात आहे, असा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येतो. केवळ गाव, शहरे आणि समाज या पुरता द्वेष मर्यादित राहिला नसून आता शैक्षणिक संस्थांमध्ये देखील असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. शाळेतील विद्यार्थी हे निरागस असतात. त्यांना जात, धर्म, पंथ याविषयी भेदभाव कळत नाही. किंबहुना त्यांच्या मनात कोणाविषयी फारसा रागलोभ नसतो. परंतु उत्तर प्रदेशात एका शिक्षिकेने एका अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून त्याला दुसऱ्या काही मुलांकडून मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. आता या घटनेचे भांडवल करीत विरोधकांनी भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे. एक प्रकारे या शाळेतील या विद्यार्थी मारहाण प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, असे दिसून येते.
अशी झाली घटना उघड
गेल्या वर्षभरापासून उत्तरप्रदेशात जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या खऱ्या – खोट्या घटना एका मागून एक समोर आहेत. त्यातच आता मुझफ्फरनगर जिल्ह्यात खुब्बापूर गावातील एका शाळेत दुसरीतील अल्पसंख्य समाजाच्या एका विद्यार्थ्यांने गृहपाठ न केल्यामुळे शिक्षिका तृप्ती त्यागी यांनी कथित जातीयवादी शेरेबाजी केली, तसेच त्याला भरवर्गात चापट तथा थपडा मारण्यास सांगितले. वर्गातील इतर विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप आहे. आणखी भयानक म्हणजे या घटनेची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्याने त्याविरुद्ध मोठे पडसाद उमटले. मुझफ्फरनगर पोलिसांनी या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. परंतु अद्याप आरोप जाहीर केले नाहीत. या चित्रफितीची दखल घेऊन स्थानिक पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे विद्यार्थ्यांला मारहाण करण्यात आल्याचे चित्रफितीच्या प्राथमिक तपासातून निदर्शनास आले आहे. मात्र त्यात आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही. दरम्यान राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने आवाहन केले आहे की, या मुलाची ओळख उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
विविध क्षेत्रातून प्रतिक्रीया
सध्याच्या काळात देशात कोणतीही सामाजिक घटना घडली की लगेच त्याचे पडसाद उमटतात आणि त्याचा फायदा राजकीय नेतेमंडळी घेतात आणि त्यावरून शेरेबाजी सुरू करतात सध्याही या घटनेवरून असाच प्रकार सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून कठोर शब्दांत या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच कारवाईची मागणी करण्यात येत आहे. त्यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. या घटनेचा कथित व्हिडिओ समाजवादी पक्षाने सोशल मिडियात पोस्ट केली आहे. भाजप आणि संघाच्या द्वेषमूलक राजकारणामुळे देशाला हे दिवस पहावे लागत आहेत. या शिक्षिकेला तातडीने बडतर्फ करून कठोर शिक्षा दिली जावी, असेही म्हटले आहे.
खरगेंचा आरोप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला, की शाळेतील मुलाला झालेली कथित मारहाण हा भाजपच्या द्वेषजनक-फुटीरतावादी राजकारणाचा परिपाक आहे. असे राजकारण घटनाबाह्य आहे. अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात म्हटले होते, की, शाळेसारख्या जागेलाही ‘द्वेषाचा बाजार’ बनवला जात आहे. त्यांनी ‘एक्स’ वर नमूद केले होते, की हे ज्वालाग्राही इंधन भाजपने देशात पसरवले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आग भडकली आहे, असेही ते म्हणतात.
दरम्यान, बॉलिवूड, मनोरंजन, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती, तज्ज्ञ आणि मान्यवरांनी या घटनेचा निषेध केला आहे.
Uttar Pradesh Crime School Teacher Student Beaten Video Viral