इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या आठवडाभरापासून धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवर कारवाई सुरू झालेली असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता रस्त्यावर आयोजित होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांकडे मोर्चा वळवला आहे. सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी धर्मगुरूंशी संवाद साधून धार्मिक कार्यक्रम रस्त्यांवर आयोजित करून वाहतुकीस अडथळा आणू नये हे सुनिश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टीम-९ च्या बैठकीत त्यांनी हे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आज साजऱ्या होणाऱ्या ईद, परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया या दिवशी धर्मगुरूंशी संवाद साधून रस्ते वाहतुकीस अडथळे आणण्याचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये हे सुनिश्चित करा, असे आदेश त्यांनी दिले. सध्याच्या वातावरणात पोलिस आणि प्रशासनाने आणखी संवेदनशील राहून काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक सण शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा व्हावा. त्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चना इत्यादी संबंधित ठिकाणीच केले जावेत. असे सांगताना त्यांनी आगीच्या घटना रोखण्यासाठीसुद्धा कठोर उपाययोजना आखण्याचे निर्देशही दिले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नियम तोडणाऱ्या ध्वनिक्षेपकांविरुद्ध योगी सरकारने कारवाई सुरू आहे. उत्तर प्रदेशात एका आठवड्यात जवळपास ५४ हजार ध्वनिक्षेपक हटविण्यात आले आहेत. तसेच ६० हजार २९५ ध्वनिक्षेपकांचे आवाज कमी करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या कारवाईदरम्यान ध्वनिक्षेपकांच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळले होते. ध्वनिक्षेपकांविरुद्धची कारवाई अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे.