मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशात अवघ्या ७२ तासांमध्ये ११ हजाराहून अधिक भोंगे उतरविण्यात आले आहेत. त्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. आता यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरविण्यात आलेले नाहीत. तर, तेथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रातही पालन व्हावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशांचे पालन करीत आले आहे. मात्र, सध्याचा भोंग्यांचा विषय हा केवळ राजकीय वातावरण तापविण्यासाठी आहे. राज्य सरकारने जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली त्यावर भाजपने बहिष्कार घातला. कारण, त्यांना या विषयावर फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे, हे अगदी स्पष्ट आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.