लखनऊ (उत्तर प्रदेश) – अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून लखनऊमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट उत्तर प्रदेश पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिनहाज अहमद आणि मसरुद्दीन यांनी लखनऊसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये १५ ऑगस्टला हल्ला घडवून आणण्याचा कट रचला होता.
अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार आणि एटीएसचे महासंचालक डॉ. जी. एस. गोस्वामी यांनी दहशतवाद्यांच्या कटाबाबत माहिती दिली. दहशतवादी मिनहाज आणि मसरुद्दीन यांनी लखनऊमध्ये प्रेशर कुकर बॉम्ब तयार करण्यासह १५ ऑगस्टच्या आधी लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, आगरा, मेरठ, बरेली आणि अयोध्येत हल्ला घडवून आणण्याचा कट रचला होता. या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शनही समोर आले आहे. अंसार गजवातूल हिंद या संघटनेशी दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध आहे. उत्तर प्रदेशमधील मोठे धार्मिक स्थळे दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. ते मानवी बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणण्याच्या तयारी होते.
लखनऊसह कानपूरमधून या दहशतवाद्यांना मदत केली जात होती. १५ ऑगस्टपूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना होती, असे दोघांनीही कबूल केले आहे. त्यांच्या हिटलिस्टवर भाजपचे अनेक मोठे नेते होते. भाजपच्या स्थानिक खासदारांवर येत्या काही दिवसांतच हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता.
पाकिस्तान मुख्य सूत्रधार
या दोन्ही दहशतवाद्यांचे सूत्रधार पाकिस्तानात आहेत. पेशावरमधून त्यांना अल झैदी सूचना करत होता. त्यांना मदत करणारे लखनऊ आणि कानपूरमधील संशयितांचेसुद्धा पाकिस्तनाशी संबंध आहेत. ते स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके जमा करत होते. मिनहाज याच्या लखनऊमधील घरातून स्फोटके जप्त केली आहेत. मसरुद्दीनला मडियाव येथून अटक केली आहे. दोघांकडून प्रेशर कुकर बॉम्ब, अर्धनिर्मित टाइम बॉम्ब, स्फोटकांची सामग्री हस्तगत केली आहे. मिनहाजच्या घरातून एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.