अलाहाबाद (उत्तर प्रदेश) – भारतात कुठल्या गोष्टीचा देवत्व प्रदान केले जाईल आणि कधी दगड उभा करून त्याला शेंदूर फासला जाईल, याचा नेम नाही. श्रद्धा आणि पुजा-अर्चना एकवेळ समजू शकतो, पण नव्याने जन्माला आलेल्या देवाला नाव तरी विचार करून द्यायचा ना. उत्तर प्रदेश तर कायमच चित्र-विचित्र घटनांसाठी प्रसिद्ध आहे. आता प्रयागराजमध्ये चक्क कोरोना माताचे मंदिर उभे करण्यात आले आहे.
एकायला गंमत वाटेल, पण सत्य आहे. हे मंदिर आता प्रतापगढ येथील ग्रामीण जनतेच्या आस्थेचा विषय होऊन बसला आहे. प्रतापगड जनपदच्या ग्रामीण नागरिकांनी हे मंदिर उभे केले आहे. कोरोना देवीची काल्पनिक प्रतिमा तयार करण्यात आली आणि त्यानंतर पुजा-अर्चना सुरू झाली. मात्र एकच बाब याठिकाणची कौतुकास्पद आहे, ती म्हणजे इथे केवळ पुजा होत नाही तर कोव्हीड-१९ च्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहनही केले जाते. कोरोना महामारीने लाखोंचे आयुष्य उद्धवस्त केले. त्यामुळे कोरोना मातेकडे संकट दूर करण्यासाठी दररोज प्रार्थना होत आहे. आता प्रतापगड येथील कोरोना माताचे मंदिर साऱ्या देशात व्हायरल होऊ लागले आहे.
असे स्थापन झाले मंदिर
हे मंदिर शुकुलपूर भागात असून गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे येथील 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक पॉझिटीव्ह आले आणि त्यांचा जीव वाचला. त्यानंतर सारे गावकरी एकत्र बसले आणि या संकटातून औषधाने सुटका होणे शक्य नाही, असा निष्कर्ष चर्चेतून निघाला. त्यासाठी देवी-देवतांच्या पुजेचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यानंतर कोरोना माताची स्थापना झाली आणि आता त्याला मंदिराचे स्वरुप आले आहे. सोशल मिडीयावर हे मंदिर व्हायरल झाल्यानंतर इथे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
म्हणून मंदिराची कल्पना
एखादे संकट आले की आपण देवी-देवतांना शरण जातो. त्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि संकटाशी लढण्यासाठी शक्तीही मिळते. त्यातून या मंदिराची कल्पना सूचली, असे गावातील प्रमुखाने म्हटले आहे. तर मानसोपचारतज्ज्ञांनी हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.
मंदिराबाहेरच्या सूचना
– मास्क लावा
– मूर्तीला स्पर्श करू नका
– सोशल डिस्टन्सिंग पाळा
– कोरोना माताला केवळ फुलं वाहायची
– दर्शनापूर्वी मास्क लावा व हात-पाय स्वच्छ धुवा
– सेल्फी घेताना मूर्तीला स्पर्श करू नका