इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात सध्या भोंग्याचा प्रश्न गाजत आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंगे हटवण्याचे आदेश दिले आहेत. परवानगीने जे भोंगे वाजत असतील त्यांचा आवाज त्या आवारातून बाहेर पडू नये. उत्तर प्रदेश मध्ये गेल्या ७२ तासात सुमारे ११ हजाराहून अधिक भोंगे हटविण्यात आले आहेत. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले आहे.
भोंग्याच्या वादाला तोंड देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मंदिर आणि मशिदींमधून भोंगे हटवण्याचे आदेश दिल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. योगींचे कौतुक करताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मात्र खिल्ली उडवली आणि त्यांना पीडित म्हटले आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1519555642801135617?s=20&t=yI2PUbRSO1jQZh6oze3MAw
राज ठाकरे यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये ट्विट करून लिहिले की, “धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींमधून भोंगे हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. दुर्दैवाने महाराष्ट्रात ‘योगी’ नाही, आपल्याकडे इतर लोक आहेत. महाराष्ट्र सरकारला बुद्धी द्यावी म्हणून मी देवाला प्रार्थना करतो.
वास्तविक हा वाद राज ठाकरेंनी सुरू केला होता. मशिदींमधून भोंगे काढण्याची विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यासाठी येत्या ३ मे चा अल्टीमेटमही देण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्वपक्षीय बैठकही घेतली आहे. सरसकट भोंगे उतरविणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे.