डेहराडून (उत्तराखंड) – शिक्षण कधिही कुठल्या संसाधनांच्या प्रतीक्षेत राहात नाही. जिद्द असेल तर अभ्यासाच्या, शिक्षणाच्या आडवे काहीही येत नाही. उत्तराखंडच्या रुद्रपूर येथील रहिवासी ७१ वर्षीय ऊषा श्रीवास्तव यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नांमध्ये या वयात आल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ऊषा या स्वातंत्र्यसेनानी रामकिशोर श्रीवास्तव यांच्या स्नुषा आहेत. तर त्यांचे वडील कौशल श्रीवास्तवही स्वातंत्र्यसेनानी होते.
१९६९ मध्ये डॉ. विजय कुमार श्रीवास्तव यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. त्यावेळी त्यांचे पती पशुचिकित्सक होते. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घातले. त्यातच ऊषा यांनीही पतीला साथ द्यायला सुरुवात केली. १९७२ मध्ये त्यांनी रुद्रपूर डिग्री महाविद्यालयात एमए केले. त्यानंतर १९८३ मध्ये नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केला आणि आपल्या चारही मुलींना उच्च शिक्षण दिले.
ऊषा यांच्या धाकट्या मुलीने २०१३ मध्ये वकिलीचे शिक्षण सुरू केले तर त्यांचीही वकील होण्याची इच्छा झाली. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांना शेतातच जास्तीत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. त्यानंतर आल इंडिया बार एक्झामचा फॉर्म भरला व पहिल्याच प्रयत्नांत त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या कामगिरीने मुली फारच आनंदी आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री दोन तास त्या अभ्यास करायच्या.
मुलींमध्ये जिद्द पेरली
उषा यांच्यातील शिक्षणाची जिद्द अशी काही होती की त्यामुळे त्यांच्या चारही मुलींमध्ये मोठ्या स्वप्नांचे अधिष्ठान निर्माण झाले. डॉ. शैलजा व डॉ. दीपिका अमेरिकेत शास्त्रज्ञ आहेत. एक मुलगी आभा चेन्नईत समाजसेविका आहे. तर सर्वांत धाकटी मुलगी अंशुल आहारतज्ज्ञ आहे.