इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिलिकॉन व्हॅली बँकेने ताळेबंदातील तूट भरून काढण्यासाठी २ अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होताच गुंतवणूकदार आणि बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात बँकेच्या समभागांची विक्री सुरू झाली. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. अखेर बँकेला निधी उभारण्याची योजना रद्द करावी लागली. परंतु, वेळ निघून गेली होती. परिणामत: केवळ ४८ तासांत ही बँक कोसळली.
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली आणि बँकिंग क्षेत्रातील एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. कॅलिफोर्नियातील नियामकांनी शुक्रवारी बँक बंद केली. त्याच वेळी अमेरिकेतील ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’च्या (एफडीआयसी) नियंत्रणाखाली ही बँक गेली. त्यानंतर बँकेचे समभाग गडगडले. भयभीत झालेले ठेवीदार ठेवी काढण्यासाठी धावाधाव करू लागले. निधी उभारणीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बँकेकडे स्वत:च्या विक्रीचाही पर्याय होता. परंतु, हा पर्याय स्वीकारण्याआधीच बँकेकडील ठेवी संपल्या. हे एवढ्या वेगाने घडले की काही तासांच्या कालावधीत बँकेने कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरून काम करण्यास सांगितले.
ग्राहकांचे दणाणले धाबे
बँक बुडण्याचा सर्वाधिक फटका तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअपना बसला. कर्मचाऱ्यांना वेतन कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. निधी उपलब्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याच वेळी अनेक कंपन्यांना नवीन प्रकल्प गुंडाळावे लागणार आहेत. बँकेतील प्रत्येक खात्यातील प्रत्येकी अडीच लाख डॉलर रकमेला विमा संरक्षण आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत.
USA Silicon Valley Bank Collapse Analysis