इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काही दिवसांत अमेरिकेने रशियाच्या सीमेला लागून असलेल्या लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानियामध्ये १२ हजार सैनिक पाठवले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे. यापूर्वी पोलंडमध्ये अमेरिकन सैन्याची संख्याही वाढवण्यात आली आहे. या सैनिकांना संरक्षणात्मक उपायांखाली तैनात करण्यात आले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमधील युद्ध जिंकत नाहीत, असेही बायडन यांनी स्पष्ट केले आहे.
संसदेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना बायडन बोलत होते. “आम्ही युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढण्यासाठी जात नाही आहोत. पण नाटो सदस्य राष्ट्रांच्या मालकीच्या प्रत्येक इंच जमिनीचे आम्ही संरक्षण करू, हेही निश्चित आहे.” NATO (North Atlantic Treaty Organisation) मध्ये रशियाच्या बहुतेक शेजारी देशांचा समावेश होतो. हे सर्व देश १९९१ पूर्वी रशियाचे मित्र होते. अमेरिकेने ज्या देशांमध्ये सैन्य पाठवले ते सर्व देश नाटोचे सदस्य आहेत. नाटोमध्ये सामील होण्याच्या इच्छेच्या निषेधार्थ रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे.
बायडन म्हणाले की, युक्रेनचे लोक अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत आहेत. त्यामुळे रशियन सैन्याला पुढे जाण्यात अडचणी येत आहेत. युक्रेनच्या लोकांना पाठिंबा आणि मदत करण्यासाठी युनायटेड स्टेट्स त्याच्या युरोपियन मित्रांच्या पाठीशी उभी राहील. बायडन रशियाला व्यापारापासून वेगळे करण्यासाठी G7 देश आणि युरोपियन युनियनमध्ये रशियाला मोस्ट फेव्हर्ड नेशनच्या यादीतून काढून टाकण्यासाठी सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास रशियासाठी हा आणखी एक मोठा धक्का असेल.
युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिका, युरोपियन आणि इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. रशियाच्या कनिष्ठ सभागृहातील ३८६ सदस्यांवर बंदी घालत ब्रिटनने लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली. त्याच वेळी, युरोपियन युनियन (EU) ने रशियाला लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.