इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात भाजपचे सरकार आल्यापासून माध्यमांची गळचेपी केली जात आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने भारतातील माध्यमांना आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप होत असतानाच मोदींना प्रश्न विचारणे चक्क अमेरिकेतील एका महिला पत्रकारा महागात पडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी गाजला. एकतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतची खास भेट, तेथील भाषण आणि सरकारी डिनर अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होताच. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींनी वेळ दिला असता तर त्यांच्यासोबत भारतातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भाने चर्चा करण्याची इच्छा होती, असे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील संसदेत भाषण दिले तेव्हा भारतीय वंशाचे दोन खासदारांनी भाषणावर बहिष्कार टाकला होता. हेही प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र आता आणखी एक माहिती पुढे आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा तेथील एका महिला पत्रकाराने अल्पसंख्यांकांच्या संदर्भाने त्यांना प्रश्न विचारला होता. यावरून अमेरिकेत त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरलच्या महिला पत्रकार सबरिना सिद्धिकी यांनी मोदींना भारतातील अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी प्रश्न विचारला होता. त्यानंतर ट्रोलर्सने त्यांचे जगणे हैराण करून सोडले आहे. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील उपस्थित होते.
लोकशाहीला काळिमा
मोदींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा सोशल मिडियाच्या माध्यमातून छळ करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर भारतातील सरकारने गदा आणली आहे. आणि आता प्रश्न विचारणाऱ्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केला आहे. सिद्दिकी यांनी फक्त प्रश्न विचारला होता, असेही ते म्हणाले.
मोदी घाबरतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ९ वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना ते सामोरे जात नाहीत. त्यांचे संभाषण केवळ एकाच बाजूने आहे. मन की बातद्वारे ते जनतेशी संवाद साधतात. सर्वसामान्यांचे प्रश्न पत्रकारांद्वारे उपस्थित केले जातात. मात्र, मोदी हे माध्यमांना घाबरतात. त्यामुळेच त्यांनी आजवर पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. तसेच, मोदींनी भारतात नाही पण अमेरिकेत पत्रकार परिषद घेतली. त्यातही केवळ दोनच प्रश्न घेतले. एक अमेरिकन पत्रकार आणि एक भारतीय पत्रकार यांचा. शिवाय हे प्रश्नही आधीच मागविण्यात आले. या सर्व बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवरही विविध प्रकारची टीका-टिपण्णी होत आहे.