इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमाला धर्म, जात, भाषा, देश यांचे बंधन नसतं, असं म्हणतात. ज्यांना हे सगळं मान्य असतं ते लग्न करून आनंदाने एकत्र नांदतात. पण अशाप्रकारे लग्न केल्यानंतर पत्नी ट्रॅक्टरचालक प्रियकरासोबत फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
उत्तर प्रदेशातील घटना
अमेरिकेतून भारतात सून म्हणून आलेली तरुणी गावातील ट्रॅक्टरचालक प्रियकरासोबत फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील एक तरुण अमेरिकेत राहतो. त्याला तिथलीच एक मुलगी भावली. त्याने रीतसर तिच्याशी लग्नही केले. मात्र एवढ्या प्रेमाने लग्न करून आणलेली ही पत्नीच दुसऱ्या माणसासोबत पळून गेली आहे. यामुळे सदर महिलेच्या पतीने न्यायाची मागणी करत पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पोलिसात तक्रार दाखल
कल्याणपूर गावात बांध बांधण्याचं काम करत असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाचं त्याच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपली पत्नी ट्रॅक्टर चालकासोबत फोनवर बोलायची, असाही उल्लेख त्याने तक्रारीत केला आहे. त्याला मी आणि माझ्या कुटुंबीयांनी नेहमीच विरोध केला. मंगळवारी या ट्रॅक्टरचालकाने शेजारच्याच एका मुलीच्या मदतीने माझ्या पत्नीला फूस लावली आणि तिला पळवून नेले.
मी तिचा खूप शोध घेतला. मात्र तिची काहीच माहिती मिळाली नाही. तब्बल दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन ती पळाल्याचे समोर आले. पोलीस अधिकारी दुर्गेश पांडेय म्हणाले की, या प्रकरणी पीडितेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. आता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत तिचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
USA Daughter in Law Extra Marital Affair