विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा प्रसार हा हवेतूनच होत आहे. आपण जेव्हा बोलतो त्यावेळी तोंडातून निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे अमेरिकेच्या सीडीसी संस्थेने म्हटले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने कोरोना विषाणूचा सर्वंकष अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे. तोंडातून बाहेर पडणारे सूक्ष्म द्रव्य कण हे हवेत मिसळतात तसेच ते आसपासच्या पृष्ठभागावर पडतात. त्यानंतर या सूक्ष्म द्रव्य कणांद्वारे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.
तोंडातून मोठे द्रव्य कण बाहेर पडल्यानंतर काही सेकंद किंवा मिनिटे ते हवेत राहतात आणि नंतर नष्ट होतात. मात्र, सूक्ष्म कण हे काही मिनिटांपासून तासांपर्यंत हवेत राहतात किंवा पृष्ठभागावर असतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे सीडीसीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार हवेतूनच होत असल्याचे द लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय ख्यात विज्ञान नियतकालिकाने गेल्याच महिन्यात सांगितले होते. तसा संशोधन अहवाल या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला होता. आता सीडीसीच्या दाव्यानंतर या संशोधन अहवालावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव हा हवेतूनच होत असल्याचे अनेक दावे यापूर्वी करण्यात आले. मात्र, पुरावे देण्यात आले नव्हते. आता लॅन्सेट आणि सीडीसी यांच्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, मानवाला जिवंत राहण्यासाठी श्वास आवश्यक आहे. आणि कोरोनाचा हवेतूनच संसर्ग होत असल्याने ही बाब धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.