इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेन युद्धाला आता दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून अद्यापही युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा केवळ या दोन देशांवर परिणाम झाला नसून जगभरातील अनेक देशांवर त्याचे वेगवेगळे परिणाम जाणवत आहेत. या युद्धामुळे रशिया आणि अमेरिकेचे संबंध आणखीनच तणावपूर्ण बनले असून अमेरिकेने रशियाच्या अनेक अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, रशियाचे अनेक नेते आणि अधिकाऱ्यांवर निर्बंध लादल्यानंतर आता अमेरिकेने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलींवरही निर्बंध लादण्यास मान्यता दिली आहे. पुतीन यांच्या मुलींची नावे कॅटेरिना तिखोनोवा आणि मारिया वोरोंत्सोवा अशी आहे.
कॅटेरिना तिखोनोवा आणि मारिया वोरोंत्सोवा यांचे कार्य काय आहे? : एका रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना ही एक तांत्रिक कार्यकारी आहे ज्यांचे कार्य रशियन संरक्षण उद्योगाला समर्थन देण्याचे आहे. तर मारिया सरकारच्या अनुवांशिक संशोधन कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत, तसेच त्या व्लादिमीर पुतिन यांची व्यक्तीगतरित्या देखरेख करतात. क्रेमलिन वेबसाइटनुसार, मारिया ही मोठी मुलगी असून तिचा जन्म 1985 मध्ये झाला होता आणि कॅटरिनाचा जन्म 1986 मध्ये झाला.
ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की मारिया वोरोंत्सोवा ही नोमेन्को नावाच्या कंपनीची मालक आहे. कंपनी रशियाच्या आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक प्रकल्पात सहभागी आहे. कॅटेरिना तिखोनोव्हा ही माजी स्पर्धात्मक नृत्यांगना असून ती आता मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था चालवते.
2015 मध्ये मीडियाशी संवाद साधताना पुतिन म्हणाले होते की, माझ्या मुली काय करतात हे मी सांगणार नाही. यामागे अनेक कारणे आहेत आणि सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्या आपले जीवन सन्मानाने जगत आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी सांगितले होते की, माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी महिन्यातून एकदा किंवा दोनदाच माझ्या मुलींना भेटू शकतो.
पुतीन यांच्या मुली कॅटरिना आणि मारिया यांच्यावर बंदी घालणे ही एक प्रतिकात्मक चाल असू शकते कारण त्यांच्याकडे रशियाबाहेर किती मौल्यवान मालमत्ता आहे हे स्पष्ट झालेले नाही. पुतिन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी याची रचना करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.