इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात बलशाली व्यक्ती म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओळखले जातात. यामुळेच शासकीय सुरक्षा यंत्रणेच्या गराड्यातच त्यांना कायम रहावे लागते. अशात त्यांच्याकडून गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब होणे अशक्य मानले जाते. यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या घरावर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) धाड टाकली. विल्मिंग्टन येथील निवासस्थानी तब्बल १३ तास झाडाझडती चालली. या ठिकाणाहून काही गोपनीय दस्तऐवज जप्त केल्याचा दावा करण्यात येत आहे.
या कारवाईने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. एफबीआयने कारवाई दरम्यान बायडेन यांच्या काही हस्तलिखित नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. अध्यक्षांचे वकील बॉब बाउर यांनी ही माहिती दिली. बायडेन यांनी स्वेच्छेने एफबीआयला निवासस्थानी झडती घेण्याची परवानगी दिली. मात्र, वॉरंट नसतानाही घडलेली ही घटना असामान्य आहे.
पुन्हा निवडणुकीची तयारी
अमेरिकेतील कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला केवळ दोन टर्मच राष्ट्राध्यक्ष राहता येते. बायडेन पहिल्यांदाच या पदावर निवडून गेले आहेत. ते पुन्हा निवडणुकीसाठी आपला दावा करण्याच्या तयारीत असताना एफबीआयने घेतलेली झडती बायडेन यांच्यासाठी अडचणीची ठरणारी आहे. साधारणत: गोपनीय दस्तऐवज जास्तीत जास्त २५ वर्षांनी सार्वजनिक केले जातात. परंतु, काही नोंदी जास्त काळ गोपनीय ठेवल्या जातात. बायडेन यांनी १९७३ ते २००९ या काळात सिनेटर म्हणून काम केले आहे.
दीड डझन गोपनीय कागदपत्रे
बायडेन यांच्या निवासस्थानात आणि खासगी कार्यालयांमध्ये सापडलेल्या एकूण गोपनीय कागदपत्रांची संख्या आता सुमारे दीड डझन झाली आहे. ही सर्व कागदपत्रे २००९ ते २०१६ या काळात त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. ही कागदपत्रे आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या ताब्यात आहेत. बायडेन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी असल्याचे आम्हाला आढळले, त्यामुळे आम्ही ते तत्काळ न्याय विभागाकडे सोपविले.
USA American President Joe Biden FBI Search Operations