इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परग्रहवासींबाबत आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. विशेषत पश्चिमात्य देशात तर याबाबत सातत्याने वेगवेगळे दावे केले जातात. एकीकडे रशियाला रोखणे आणि दुसरीकडे अंतराळातील विश्वाचा शोध घेणे यासाठी तंत्रज्ञानात कुशल असलेल्या अमेरिकेने सुरूवातीपासूनच या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. चंद्र असो की मंगळ अशा दूर असलेल्या ग्रह वा उपग्रहापर्यंत अमेरिका सर्व प्रथम पोहचली. त्यातच अमेरिकेने चंद्रावर अणुस्फोट करण्याची चाचपणी केली होती, अशी बाब आता समोर आली आहे. याबाबत अमेरिका सरकारच्या एडवांस्ड एयरोस्पेस थ्रेट आइडेंटिफीकेशन प्रोगाम अर्थात एएटीआईपीच्या गोपनीय कागदपत्रांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. या मोहिमेअंतर्गत अणुस्फोटासह इतर अनेक घडामोडी करण्याची योजना अमेरिकेने आखल्याचे समोर येते. तुर्तास एएटीआईपी ही संस्था सध्या निष्क्रिय असून, संस्था काम करीत नाही.
भारतात ज्या प्रमाणे माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आहे. त्याच प्रमाणे अमेरिकेत सुद्धा असाच कायदा असून, त्याच्याच आधारे एका तब्बल १६०० पानांचा हा रिपोर्ट मिळविण्यात आला. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेने चंद्रावर अणुस्फोट करण्याची योजना तर केली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नसल्याचे गोपनीय कागदपत्रांच्या आधारे समोर येते.
एका गुप्तचर संस्थेच्या माजी संचालकाने पेंटागॉनमधून राजीनामा दिल्यावर त्याबद्दलची माहिती समोर आली. चंद्रावर आण्विक हल्ल्याची योजना आखणाऱ्या या एजन्सीला अमेरिकन डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीने निधी दिला होता. अनोळखी फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ) बद्दल देखील ती चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे.
अपोलो मोहिमे बंद झाल्यानंतर सुमारे अर्धशतकानंतर अमेरिकन सरकार आणि नासा चंद्राच्या पृष्ठभागावर परत जाण्यासाठी जोर देत आहेत. अशा स्थितीत या नव्या खुलाशाबाबत प्रश्न उपस्थित होणे अत्यावश्यक आहे. अणुस्फोटांचा वापर करून चंद्रावर बोगदा करण्याची खरोखरच योजना होती का, याची सर्वाधिक चर्चा सुरू आहे.