इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक मोबाईल वापरकर्ते 5G इंटरनेटची वाट पाहत होते, आता ही सेवा अमेरिकेत सुरू होत असून 5G कनेक्टिव्हिटी वापरकर्त्यांना सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद घेता येईल, परंतु त्याच वेळी विमान प्रवास करताना मात्र 5G सेवेचा वापर करणे धोकादायक असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, त्यामुळे याच्याशी संबंधित धोक्यामुळे जगभरातील विमान प्रवासी आणि विमान कंपन्यांची चिंता वाढली आहे.
एमिरेट्स, एएनए आणि जपान एअरलाइन्ससह इतर अनेक कंपन्यांनी यूएस विमानतळांजवळ सुरू होणार्या 5G नेटवर्कच्या धोक्यामुळे आधीच अमेरिकेला जाणारी त्यांची काही उड्डाणे रद्द केली आहेत. अमेरिकेतील हवाई वाहतूक उद्योगातून मोठा विरोध होत आहे. यामुळे, आता Verizon आणि AT अॅण्ड T ने विमानतळाभोवती 5G सेवा सुरू करणे तूर्तास पुढे ढकलले आहे. 5G नेटवर्क विमानांसाठी धोकादायक ठरू शकते का याचा शोध घेतला जात आहे.
बोईंग या विमान निर्माता कंपनीच्या तपासणीत आढळले की, 5G नेटवर्कमुळे बोईंग 777 विमानाच्या फ्लाइट टेलिमेट्रीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. फ्लाइट टेलीमेट्रीमधील त्रुटीमुळे, विमानाची स्वयंचलित यंत्रणा उंचीचा अचूक अंदाज घेऊ शकली नाही. तसेच वैमानिकासाठी योग्य उंचीच्या माहितीशिवाय विमान उतरवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळेच एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेला जाणारे बोईंग 777 विमान सध्या ग्राउंड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यूएसने 5G साठी मध्यम-श्रेणी बँडविड्थ फ्रिक्वेन्सीचा लिलाव केला असून विमानाच्या अल्टिमीटर रेडिओ सिग्नलसह फ्रिक्वेन्सीच्या समान श्रेणीचा वापर केला. यामुळे अल्टिमीटर योग्यरित्या कार्य करत नाही. याबाबत फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने असे म्हटले आहे की, सी-बँड 5G काही विमानावरील रेडिओ वेव्ह रडार अल्टिमीटरमध्ये हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण होते. कारण कोणत्याही विमानाच्या योग्य ऑपरेशनसाठी रडार अल्टिमीटरचे योग्य ऑपरेशन खूप महत्वाचे आहे.
विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, सध्याच्या काळात, 5G मुळे ज्या भागात रेडिओ लहरी जास्त प्रमाणात विस्कळीत होतात, अशा ठिकाणी विमानांना रेडिओ अल्टिमीटर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. कारण, यामुळे काही विमानांना लँडिंगचा त्रास होऊ शकतो. या समस्येमुळे खराब हवामानात एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागतील किंवा उशीर करावा लागेल, असेही अमेरिकन विमान कंपन्यांचे म्हणणे आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने 5G च्या दृष्टीने विमानाच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी काही आवश्यक पावले उचलली आहेत. यासाठी FAA ने 50 विमानतळांजवळ बफर झोन तयार केला आहे. या बफर झोनमध्ये 5G नेटवर्कच्या सेवा अत्यंत मर्यादित ठेवल्या जातील. याशिवाय,अशा अल्टिमीटर्सचाही शोध घेतला जात आहे, जे 5G मध्ये कोणत्याही अडचणीशिवाय काम करू शकतात. याव्यतिरिक्त, विमानांना सुरक्षितपणे उतरण्यास मदत करण्यासाठी रेडिओ अल्टिमीटरऐवजी GPS वापरला जाऊ शकतो. तथापि, काही एअरलाइन्स या FAA च्या उपायांशी पूर्णपणे सहमत नाहीत याउलट त्यांची मागणी आहे की, अशा प्रभावित विमानतळांच्या दोन मैलांच्या आत 5G नेटवर्कवर बंदी घालावी.
एका अहवालानुसार काही विमानांना 5G C-बँडचा धोका नाही. 5G नेटवर्कमुळे, Airbus A350 आणि Airbus A380 व्यतिरिक्त, काही इतर विमाने आहेत जी US विमानतळांजवळ 5G नेटवर्क कार्यरत असताना देखील आरामात उतरू शकतात आणि टेक-ऑफ देखील करू शकतात. दरम्यान, एका वृत्तानुसार, अमेरिकन एजन्सीकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर एअर इंडियाने अमेरिकेसाठी बोईंग 777 ची सेवा पुन्हा सुरू केली आहे. तथापि, 5G मुळे होणाऱ्या हानीबद्दल कोणताही ठोस वैज्ञानिक अभ्यास समोर आलेला नाही.