इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उर्फी जावेद हिला फॅशन क्वीन आणि सोशल मीडिया क्वीन म्हटलं तरी हरकत नाही. कारण उर्फी तिच्या चित्रविचित्र फॅशन्समुळे सोशल मीडियावर भलतीच प्रसिद्ध आहे. तिचे ३० लाखांपेक्षा अधिक चाहते आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून उर्फी नेहमी विचित्र कपड्यांमधले फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यावरून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी उर्फीला टीकेचे लक्ष्य केले. मोबाइल फोनचं व्यसन देशातील तरुणाईवर कशा पद्धतीने नकारात्मक परिणाम करतंय हे सांगताना त्यांनी उर्फीचं उदाहरण दिलं. उर्फीच्या फोटो आणि व्हिडीओंना इन्स्टाग्रामवर कोट्यवधी लाईक्स असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता चेतन भगत यांच्या याच टीकेवर उर्फी संतापली आहे. तिने चेतन भगत यांना थेट सुनावलं आहे.
एका कार्यक्रमात चेतन भगत त्यांनी उर्फीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, उर्फी जावेदच्या फोटोंवर कोट्यवधी लाईक्स असतात. देशाचा एक तरुण असा आहे जो कारगिलमध्ये बसून देशाची सुरक्षा करतोय आणि दुसरीकडे काही तरूण उर्फीच्या फोटोंना लाईक करतायत. त्यांची ही टीका पाहून उर्फी देखील संतापली आहे. चेतन भगत यांच्या या वक्तव्यावर उर्फीने सोशल मीडियाद्वारेच त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. आपल्या इन्स्टा पोस्टमधून तिने त्यांना उत्तर दिलं आहे. ‘मी टू मोहिमेदरम्यान कशाप्रकारे अनेक महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते, हे विसरू नका’, असं तिने लिहिलं. यासोबतच तिने ‘मी टू’ मोहिमेदरम्यान व्हायरल झालेले चेतन भगत यांच्या व्हॉट्सॲप मेसेजेसचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला.
तुमच्यासारखे पुरुष हे स्वत:च्या उणिवा स्वीकारण्यापेक्षा नेहमीच दुसऱ्या महिलांना दोष देतात. तुम्ही विकृत आहात याचा अर्थ असा नाही की मुलीचा दोष आहे किंवा ती कोणते कपडे परिधान करतेय याचा दोष आहे, असेही ती म्हणते. गरज नसतानाही तुम्ही माझा त्या संवादात उल्लेख केला आणि कपड्यांवर टिप्पणी केली. माझ्या कपड्यांमुळे देशातील तरुणांचं लक्ष विचलित होत असेल, तर तुम्ही मुलींना पाठवलेले मेसेज वाचून ते विचलित होणार नाहीत का’, असा सवाल उर्फीने केला.
रेप कल्चरचं प्रमोशन करणं थांबवा. पुरुषांच्या वागणुकीसाठी महिलांच्या कपड्यांना दोष देणं हे खूप जुनाट झालं आता. स्वत:पेक्षा अत्यंत कमी वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज केले, तेव्हा हे विचार कुठे गेले? तुमच्यासारखे लोक तरुणांची दिशाभूल करतात. मुलींच्या कपड्यांना दोष देण्यासाठी तुम्ही पुरुषांना प्रोत्साहन देत आहात’, अशा शब्दांत उर्फीने चेतन भगत यांना फटकारलं आहे.
Urfi Javed and Chetan Bhagat Screenshot Controversy