रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २००७ च्या सेझ विरोधी आंदोलन प्रकरणी उरणचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्यासह शिवसेनेच्या ७ कार्यकर्त्यांना बुधवारी अटक करण्यात आली होती.त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.त्यावर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बेलापूर न्यायालयाने त्यांना जमिन मंजूर केला आहे.
उरण,पनवेल व पेण तालुक्यातील ४५ महसूली गावातील ३० हजार एकर शेतकऱ्यांच्या जमिनी एसईझेड प्रकल्पासाठी तत्कालिन सरकारने सक्तीने भुसंपादन केल्या होत्या.या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शिवसेनेचाही प्रखर विरोध होता.त्यामुळे हा एसई झेड विरोधात शिवसेनेने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा सेझ प्रकल्प हटाव या मागणीसाठी कोकणभवन येथील कोकण आयुक्त कार्यालयावर १६ ऑगस्ट २००७ रोजी आंदोलन केले होते.
यामध्ये आंदोलनात अनेक वाहनांची तोडफोड झाली होती.या संदर्भात सिबीडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आला होता.तब्बल १७ वर्षे न्यायालयात सुनावणी सुरु होती.या सुनावणीला वारंवार समन्स देऊनही गैरहजर राहत असल्याने संबंधिताना १६ ऑक्टोबर रोजी वारंट काढण्यात आले होते.या प्रकरणी ७ जणांना बेलापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.त्यांना १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बेलापूर न्यायालयाने जमीन मंजूर केला असून,तळोजा कारागृहातून संबंधितांची सायंकाळी सुटका करण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
उरणचे माजी मनोहर भोईर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर,तालूका प्रमुख संतोष ठाकूर,माजी सभापती विश्वास म्हात्रे,रामचंद्र देवरे,पद्माकर तांडेल व गुरुनाथ पाटील यांनी अटक झाल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले होते.त्यामुळे ही बातमी समजताच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील,संपर्क प्रमुख महादेव घरत,संघटक बी.एन.डाकी,दिपक भोईर,रुपेश पाटील,महेश वर्तक यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलापूर येथे गर्दी केलीहोती.
सेझ विरोधी लढा हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवणारा होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी राजकारण केले की काय ? असा सवाल शिवसेनेकडून करण्यात येत आहे.