मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात १ एप्रिलपासून सुरु असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती भरण्यासाठी संबंधितांना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांमार्फत नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील थकित शास्तीवर ३१ जुलै २०२२ पूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तर या मुदतीत संबंधितांनी दंड न भरल्यास दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर ५० टक्के दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलमान्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्यांसाठी ही माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. ही माफी योजना मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहेत. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट मिळेल.
याबाबतची सविस्तर माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाच्या 8888007777 या टोल फ्री क्रमांकावर आणि complaint@igrmaharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Up to 90 percent off 31st July Offer Stamp and Revenue Department Maharashtra Government IGR