इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खासगी हॉस्पिटल किंवा रुग्णालयांमध्ये प्रचंड प्रमाणात फी आकारली जात असल्याने तेथील वैद्यकीय सेवा गरिबांना परवडत नाही, सहाजिकच ते शासकीय रुग्णालयात जातात. तर शासकीय रुग्णालयातील सेवा चांगली नसल्याचा विनाकारण आरोप करीत श्रीमंत नागरिक केवळ खासगी रुग्णालयातच उपचार घेतात. परंतु सरकारी रुग्णालय हे देखील सर्वांसाठी असून त्यात गरीब-श्रीमंत हा भेदभाव नसतो किंबहुना सरकारी रुग्णालयातील सेवा ही सर्वांसाठी चांगली असते हे दाखविण्या करिता कर्नाटकातील वरिष्ठ सनदी अधिकारी महिलेने नवा आदर्श निर्माण केला आहे.
बेल्लारी येथील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी के.आर. नंदिनी यांनी स्वतःच्या प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयाची निवड केली. बेल्लारी जिल्हा परिषदेच्या सीईओ व आयएएस अधिकारी के.आर. नंदिनी यांनी नॉर्मल प्रसूतीने एका मुलीला जन्म दिला. आपल्या प्रसूतीसाठी नंदिनीने मोठ्या खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयाची निवड करून एक आदर्श निर्माण केला आहे.
नंदिनी या 2017 च्या बॅचमधील अधिकारी असून IAS परीक्षेत टॉपर आहेत. दोन वर्षांपूर्वी त्या बेल्लारी येथे आल्या. याआधी त्या तप्तीतूर मध्ये सहायक आयुक्त होत्या. नंदिनी या कोलार जिल्ह्याच्या केंबोडी गावातील रहिवासी आहे. नंदिनी या प्रसिद्ध विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधील सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक विजेत्या आहेत. शासकीय रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे मुलीला जन्म देऊन त्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी बेल्लारी जिल्हा परिषदेच्या सीईओ असलेल्या आयएएस अधिकारी एस.एस. नकुल यांची पत्नी पूजा हिनेही याच रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता. सर्वांनाच शासकीय रुग्णालयात चांगली सुविधा मिळते असे नंदिनी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. मला गरीब-श्रीमंत हा भेद मान्य नाही असेही त्या म्हणाल्या.