इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परिस्थिती कशीही असो, माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रत्येक परिस्थिती त्याच्यासमोर नतमस्तक होत असते, असे म्हणतात, तसेच ‘कोशिश करने वाले की कभी हार नही होती, ‘ असेही म्हटले जाते. मैनपुरीच्या सूरज तिवारीनेही असेच काहीसे केले. यूपीएससी परीक्षेत ९७१ वा क्रमांक मिळाला. वास्तविक सूरजला दोन्ही पाय नाहीत, एक हातही नाही आणि एका हाताला तीन बोटे आहेत. सूरजने आर्थिक दुर्बलता आणि अपंगत्व आपल्या यशाच्या आड येऊ दिले नाही.
…तरीही सूरजने हार मानली नाही
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील कुरवली नगर येथील रहिवासी राजेश तिवारी यांचा मुलगा दिव्यांग सूरज तिवारी याने आपल्या अपंगत्वावर मात करून यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. सूरज बीएससी करत असताना सन २०१७मध्ये गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात दोन्ही पाय, उजव्या हाताची कोपर आणि डाव्या हाताची दोन बोटे कापण्यात आली होती. यानंतरही सूरजने हार मानली नाही. त्याने २०२१ मध्ये जेएनयू, दिल्लीतून बीए केले. यानंतर एम.ए. त्यानंतर आयएएसची तयारी सुरू केली.
लोकांनी वाटली मिठाई
सूरजने असे घवघवीत यश मिळवले असून त्याच्या यशाची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावात लोकांनी मिठाई वाटली. सूरज तिवारी यांनी सुरुवातीचे शिक्षण शहरातील महर्षी परशुराम शाळेतून घेतले. त्याने २०११ मध्ये एसबीआरएल इंटर कॉलेज मैनपुरीमधून हायस्कूल परीक्षा आणि २०१४ मध्ये संपूर्णानंद इंटर कॉलेज आरामसराय बेवार मधून इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण केली. सूरज तिवारीचे वडील राजेश तिवारी हे व्यवसायाने शिंपी आहेत.
आनंदाचा वर्षाव.
अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर होताच सूरजच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव झाला. सूरज तिवारीने यूपीएससी परीक्षेत ९१७ वा क्रमांक पटकावला आहे. सुरज म्हणाला की, परिस्थिती कशीही असो, पण हिंमत हारता कामा नये, आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र मनोबल तुटू नये. खरे तर सूरज या अपघातामुळे थोडा खचला होता, पण त्याने हार मानली नाही. आज ही वाईट घटना विसरून त्याने देशातील सर्वात कठीण नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली असून तरुणांना समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
UPSC Suraj Tiwari Success Story