इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा २०२१चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी ६८५ उमेदवार यशस्वी झाले आहेत. उमेदवारांच्या या यादीत दिल्लीतील रोहिणी येथे राहणारे सम्यक एस जैन यांचे नावही या परीक्षेत सातव्या क्रमांकावर आले आहे. सम्यकने मीडियाशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला, त्याचबरोबर स्वत:बद्दलची माहितीही त्यांनी शेअर केली आहे.
सम्यक जैन म्हणाले, “निकाल पाहून मला खूप आनंद झाला. सिंगल डिजिटमध्ये एवढी चांगली रँक मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. यूपीएससीचा प्रवास खूप कठीण होता, पण आता मागे वळून पाहताना हा प्रवास आनंददायी वाटतो. मी PWD श्रेणीतील आहे आणि दृष्टिहीन आहे. परीक्षेत लिहिण्यासाठी मला लेखकाचीही मदत घ्यावी लागली. प्रिलियम्स परीक्षेत माझी आई माझ्यासाठी लेखिका बनली आणि माझ्या एका मित्राने मेन्समध्ये पेपर लिहिला. माझ्या आई-वडिलांनी विशेषतः माझ्या आईने या प्रवासात मला खूप साथ दिली. एवढेच नाही तर माझ्या मित्रांनी मला खूप मदत केली. मला अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज होती, माझ्या मित्रांनी मला आवश्यक असलेली सर्व पुस्तकांची व्यवस्था केली. आज मी ज्या स्थानावर उभा आहे ते माझे संपूर्ण कुटुंब, माझे आई-वडील आणि माझ्या मित्रांच्या पाठिंब्यामुळे आहे. हे माझे एकट्याचे यश नाही.”
शैक्षणिक पार्श्वभूमी
सम्यक जैन हे दिल्लीतील रोहिणी येथे राहतात. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या SOL मधून इंग्रजी ऑनर्समध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मधून इंग्रजी पत्रकारितेचा कोर्स केला. यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंधात एमएची पदवी मिळवली.
दुसऱ्या प्रयत्नात यश
सम्यक यांचा पहिला प्रयत्न २०२०मध्ये होता. ज्यामध्ये ते यूपीएससी परीक्षा पास करू शकले नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही आणि २०२१ मध्ये पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने सातवा क्रमांक मिळविला.
लॉकडाऊन आणि लक्ष्य
सम्यक जैनने मार्च २०२० मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. जेव्हा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी बाहेर सगळंच बंद, शांत होतं. अभ्यासासाठी हीच चांगली वेळ आहे हे ओळखत त्यांनी अभ्यास सुरु केला.
आपल्या देशात विकास आणि सुधारणेसाठी जे काही धोरण आखले जात आहे, ते खूप चांगले आहे, मात्र त्या धोरणाची योग्य अंमलबजावणी होत नाही, असे मला वाटते. मी या समस्येवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. यासोबतच मला मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर काम करायला आवडेल, असे जैन म्हणाले.