पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या ग्रामीण भागातील दोघांनी यूपीएससीत झेंडा फडकाविला आहे. त्यापैकी एकाचे वडील चहा विकायचे, दुसऱ्याचे पिता आधी सैन्य दलात आता शेती करतात. विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या युवकांनी ध्येय गाठले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले ही अभ्यासात मागे असतात, हा समज त्यांनी खोटा ठरविला आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलेही स्पर्धा परीक्षेत मागे नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. आहे.
संगमनेरचे मंगेश खिलारी
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील सुकेवाडी येथील मंगेश खिलारीने यूपीएससी परीक्षेत ३९६वा क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २३व्या वर्षी मंगेशने हे घवघवीत यश मिळवले आहे. एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात मंगेशचा जन्म झाला. त्याचे वडील चहाची टपरी चालवतात. आई विडी कामगार असून शेतातही काम करते. विशेष म्हणजे मंगेशचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यानंतर पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली. त्याच वेळी त्याने पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मुळात लहानपणापासून मंगेश हा हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात होता. आयआयटी आणि यूपीएससी असे दोन पर्याय त्याच्याकडे होते. आर्थिक परिस्थितीमुळे मंगेशला आयआयटीपर्यंत पोहोचता आले नाही. पण यूपीएससी देण्याचा त्याचा निश्चय पक्का होता.
वडिलांना मिठी मारणार
मंगेशला आयएएस व्हायचे आहे. खरे म्हणजे आपला मुलगा मंगेश नेमके काय करतोय हे त्याच्या वडिलांना थोडीशी माहीत आहे. पण आईला त्या गोष्टी तितक्याशा समजत नाहीत. ती माऊली सांगते की, माझा मुलगा खूप मोठी परीक्षा देत आहे.आजपर्यंत खूप कष्ट केले, मात्र आज मुलाचे यश पाहून आनंद झाला, असे सांगताना मंगेश याचे वडील पाराजी आणि आई संगीता यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. निकाल कळताच मंगेशने सर्वांत आधी वडिलांना फोन केला. आता गावी गेल्यानंतरही वडिलांना मिठी मारणार असल्याचे तो सांगतो.
नरखेडचा प्रतीक कोरडे
नागपुर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील भिष्णूरच्या प्रतीक कोरडे याने युपीएससीचा टप्पा सर केला आहे. मात्र, युपीएससीचा हा टप्पा सर करताना प्रतीक याची संघर्षकथा प्रेरणादायी आहे. भिष्णूरच्या जिल्हा परिषदेत शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय प्रतीक कोरडे याने ६३८वा रँक मिळवित केंद्रीय लोकसेवा आयोगाचा टप्पा सर केला. प्रतीक याने आयएएस होण्याचे मिशन कायम ठेवले आहे. प्रतिकचे वडील देशसेवेसाठी बॉर्डरवर असताना आई वंदना यांनी तिन्ही मुलांचा सांभाळ केला. २००१ मध्ये वडील नंदकुमार यांचा सैन्यसेवेचा (हवालदार) कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी शेती केली. त्याचे शिक्षण वर्ग १ ते ४ भिष्णूरची जिल्हा परिषद शाळा , पाचवी व दहावीपर्यंत नरखेडच्या नगरपरिषद शाळेत झाले.
आजारपणाचा ब्रेक
प्रतीकला दहावीत ८१ टक्के होते. नागपुरातील पटवर्धन हायस्कूल येथे त्याने १२ वीत पर्यंतचे शिक्षण घेत विज्ञान शाखेत ७६ टक्के गुण मिळविले. प्रतीकला पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये ६७ टक्के गुण मिळवित बीएससी केल्यानंतर प्रतीक याने करिअर म्हणून युपीएससीला प्राधान्य दिले. मात्र २०२१ला आजारामुळे प्रतीकला युपीएससीचा टप्पा गाठता नाही. २०२२ मध्ये त्याने हा टप्पा गाठला. प्रतीक याची मोठी बहीण पूनम कोरडे यांनी राज्य लोकसेवा आयोगाचा टप्पा गाठत स्पर्धा परीक्षेत दमदार यश मिळविले होते. प्रतिक म्हणतो की, वडिलांनी विपरित परिस्थितीत आमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी कंपनीत सेक्युरिटी विभागात काम केले आहे. भिष्णूर माझ्या वडिलांची कर्मभूमी आहे. येथून माझे प्राथमिक शिक्षण झाले. माझ्या यशाचे शिल्पकार आई-वडील असून आता पुढील टार्गेट ‘आयएएस’ हेच आहे.
UPSC Result ZP School Student Success Story