इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील काही अवघड परीक्षांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा समावेश होतो. अत्यंत कठीण अशा परीक्षेत फार कमी उमेदवार पहिल्या फटक्यात आणि चांगल्या मार्कांनी पास होतात. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला आणि पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालात इशिता किशोर या विद्यार्थिनीने अव्वल स्थान पटकावले. यानंतर इशिताच्या इंटरव्ह्यूचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मॉक इंटरव्ह्यू
अशा प्रकारचे यश मिळवल्यानंतर इंटरनेटवर तिचे नाव मोठ्या प्रमाणावर सर्च केले गेले आहे. यातूनच सोशल मीडियावर व्हायरल होणार तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा तिचा मॉक इंटरव्यूह असून यात ती सर्व कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरी जाताना दिसते आहे. तिने दिलेल्या उत्तरांनी पॅनेलमधील सदस्यही समाधानी झाल्याचे दिसते आहे. या मॉक इंटरव्ह्यूला नेटकऱ्यांकडून फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जर तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा, असा सल्लाही काही युजर्सने दिला आहे.
ठामपणे मते
इशिता किशोर कॉलेजियम सिस्टम, रशिया-चीनसह भारताचे संबंध, खासगीकरण, देशाची अर्थव्यवस्था यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते ठामपणे मांडताना दिसते. तुमच्या शैक्षणिक कारकीर्दीत तुम्ही चांगले यश मिळवले. आता तुम्ही नागरी सेवेत आल्यानंतर ही कशी कामगिरी करणार, यात कसे यश मिळवणार? या प्रश्नालाही इशिताने बेधडक आणि स्पष्टपणे उत्तर दिले आहे. या परीक्षेचा सगळा अभ्यास आपण घरीच केल्याचे इशिता सांगते. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिचे पर्यायी विषय होते.
इशिता किशोर आहे कोण?
इशिता किशोर ही श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राची पदवीधर आहे. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना होते. कमेंट्सद्वारे अनेक लोक तिचे कौतुक करत आहेत. व्हिडीओ व्हायरल करून युझर्स इशिता किशोरचे अभिनंदन करत आहेत. इशिताला तिच्या कुटुंबातूनच देशसेवेचे बाळकडू मिळाले. इशिताचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांची देशसेवा पाहून इशिताने देखील देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/IshitaKisoreIAS/status/1661177106322038784?s=20
UPSC Result Ishita Kishore Interview Video