नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाज्योती मार्फत घेण्यात आलेल्या युपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी 16 जुलै 2023 रोजी राज्यातील 102 व दिल्ली येथील दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाकडून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली आहे.
महाज्योतीच्या वतीने युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई निविदा प्रक्रीयेच्या सहायाने एजन्सी निवडण्यात आली होती. या एजन्सीच्या मार्फत 16 जुलै 2023 रोजी परीक्षेसाठी 20 हजार 218 पात्र उमेदवारांपैकी 13 हजार 184 उमेदवारांनी राज्यातील 102 व दिल्ली येथील दोन केंद्रावर परीक्षा दिली आहे.
काही परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशी साठी नियुक्त अधिकाऱ्यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल सादर करण्यासाठी सांगितले आहे. त्याअनुषंगाने गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. शिरसाठे यांनी कळविले आहे. महाज्योतीच्या परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन ही प्रकल्प व्यवस्थापक श्री. शिरसाठे यांनी केले आहे.