नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य दिलेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. त्यातील 4 विद्यार्थी इतर मागास वर्ग, 3 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती-ड मधील 3 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे तसेच विशेष मागास प्रवर्गातील 1 उमेदवारालादेखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसिद्धी देण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 47 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी योजनेसाठी पात्र 44 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक दुधाळ, ओंकार गुंडगे, पल्लवी सांगळे, शुभाली परिहार, शुभांगी केतन, श्रुती कोकटे, रोशन कच्छाव, अनुराग घुगे, सागर देठे, अनिकेत पाटील, आदित्य पाटील समावेश आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योती अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘महाज्योती’मुळे निश्चिंत मनाने मुलाखत देता आली – शुभाली परिहार
शाळेत असल्यापासून माझे प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. अडचणी होत्या, तरी फोकस सुटू दिला नाही. यूपीएससी मेन्स पास झाले. आता मुलाखतीचे दिव्य पार करावे लागणार होते आणि त्यासाठी दिल्लीत जाऊन एक आठवडा राहायचे होते. मुलाखत पास करण्यासोबत दिल्लीत निवास व भोजनाचे टेंशन होते. त्यावेळी महाज्योतीतर्फे आर्थिक सहाय्य योजनेची खूप मदत झाली. आर्थिक सुरक्षिततेने बळ वाढवले, निश्चिंत मनाने मुलाखत देता आली. मला अभिमान वाटतो की आर्थिक विवंचनेत अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थांना महाज्योतीची मदत आहे.
महाज्योतीने केले आत्मनिर्भर – रोशन कच्छाव
मी इंजिनियरींग करत असताना यूपीएससी साठी प्रयत्न सुरु केले. अधिकारी बनण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर चौथ्या प्रयत्नात पास झालो. यूपीएससी मध्ये यूपीएससी पूर्व परीक्षा, यूपीएससी मुख्य परीक्षा, यूपीएससी मुलाखत या टप्प्यातून जावे लागते. उमेदवाराला या तीनही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जर कोणत्याही परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला परत पहिल्यापासून म्हणजे पूर्व परीक्षेपासून प्रयत्न सुरू करावे लागते. या सर्वात वेळेबरोबरच जवळचा पैसाही खर्च होतो. माझ्यासारख्या विद्यार्थ्याना अभ्यासावर संपूर्ण फोकस करता येत नाही. सारखी पैशांची काळजी लागून राहिलेली असते. त्यामुळे अपेक्षित निकाल लागत नाही. यावेळी महाज्योतीच्या अर्थसहाय्य योजनेची खूप मदत झाली. महाज्योती अशा योजनांच्या माध्यमातून माझ्यासारख्या असंख्य मुलांना प्रशिक्षण देऊन, अर्थसहाय्य करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आत्मनिर्भर बनविण्याचे मोठे काम करीत आहे.
UPSC Exam Mahajyoti Students Success