नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– एका व्यापक संपर्क उपक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, यूपीएससीने शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित यूपीएससी भर्ती परीक्षांसाठीच्या जाहिरातींचे अलर्ट संदेश थेट ईमेल द्वारे पाठवण्याची सुविधा सुरु केली आहे. यूपीएससी नियमित परीक्षा घेण्याव्यतिरिक्त, वेळोवेळी भारत सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विविध मंत्रालये/ विभागांमध्ये विविध गट अ/गट ब राजपत्रित पदे भरण्यासाठी भर्ती परीक्षा आयोजित करते. कामाच्या स्वरूपानुसार या भर्तीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हे निकष असतात. याव्यतिरिक्त, अनेक प्रकरणांमध्ये इच्छित पात्रता देखील प्रदान केल्या जातात.
“आमच्या नियमित परीक्षांव्यतिरिक्त, यूपीएससीला विविध सरकारी पदांसाठी विविध मंत्रालये आणि विभागांकडून भर्ती करण्याच्या दृष्टीने विनंती केली जाते, असे यूपीएससीचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले. ही प्रक्रिया अधिक सुविहित आणि जलद गतीने व्हावी या उद्देशाने सर्व सूचना वेळेच्या आधी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत स्वीकारल्या जातात, ज्यामुळे समान भर्ती असलेल्या परीक्षा एकत्र घेणे आणि एखाद्या विशिष्ट कालमर्यादेत भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची सामायिक परीक्षा घेणे अशा प्रकारे नियोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारची विविध मंत्रालये आणि विभागाकडून आयोगाला दरवर्षी 200 हून अधिक भर्ती प्रस्ताव सादर केले जातात. तपशीलवार प्रक्रियेनंतर त्यांची ऑनलाईन जाहिरात केली जाते. केवळ 2025 मध्ये, बहुतांशी गट अ आणि गट ब राजपत्रित स्तरावर वैद्यकीय, वैज्ञानिक/ अभियांत्रिकी/ तांत्रिक, कायदेशीर, अध्यापन आणि विशेष पदांसाठी (व्यवस्थापन, वित्त, लेखा, न्यायवैद्यक लेखापरीक्षण इत्यादी) 240 हून अधिक भरती प्रस्ताव आधीच प्राप्त झाले आहेत.
सध्या, यूपीएससी त्यांच्या भरती प्रक्रियेची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज, यूपीएससीची अधिकृत वेबसाइट आणि यूपीएससीच्या अधिकृत लिंक्डइन खात्याद्वारे करते. या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. कुमार म्हणाले, “पूर्वी, वेगवेगळ्या पदांसाठी येणाऱ्या अर्जांच्या संख्येत काही तफावत दिसून आली होती. प्रकरणांच्या छाननी दरम्यान काही प्रकरणे निष्फळ ठरतात कारण भरती नियमांच्या निकषांची पूर्तता करणारा कोणताही योग्य अर्जदार आढळत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये अर्जांची संख्या खूपच कमी असते. कधीकधी मुलाखतीच्या टप्प्यात मुलाखत मंडळाला योग्य उमेदवार सापडत नसल्याने पदे रिक्त राहतात. या समस्या सोडवण्यासाठी आणि गरजू, पात्र आणि योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी, आम्ही आमच्या भरती जाहिरातींसाठी नवीन उपाययोजना राबवत आहोत. या अंतर्गत इतर बाबींबरोबरच, संबंधित संस्था आणि संघटनांना ईमेल अलर्ट/अपडेट्स पाठवण्याची योजना आहे. हे अलर्ट इतर/खाजगी संस्थांना देखील उपलब्ध करून दिले जातील, जे कोणी त्यासाठी विनंती करतील. आम्हाला, यूपीएससीमध्ये, केवळ माहितीच्या अभावामुळे गुणवत्ता दुर्लक्षित राहू नये याची खात्री करायची आहे.”
भरती पदांसाठी नवीन आउटरीच/ व्याप्ती धोरणांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन आहे:
विद्यापीठे, संस्था, संघटना, व्यावसायिक / मान्यताप्राप्त संस्था इत्यादींना ईमेल अलर्ट पाठवले जातील.
अशा सूचना आणि अपडेट्स प्राप्त करण्यासाठी यूपीएससीला विनंती पाठवणाऱ्या इतर संस्थांना मागणीनुसार ईमेल अलर्ट देखील पाठवले जातील. अशा विनंत्या ra-upsc[at]gov[dot]in वर पाठवता येतील
अधिकृत पत्रव्यवहार मंत्रालये आणि विभागांना पाठवले जातात ज्यात त्यांना त्यांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया नेटवर्क्सवर भरती जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले जाते.
लिंक्डइनवर यूपीएससीच्या जाहिराती शेअर केल्या जात आहेत आणि पब्लिक ब्रॉडकास्टरद्वारे त्या प्रसिद्ध करण्याच्या योजना सुरू आहेत.
आयोगाच्या वेबसाइटवर RSS फीड्स सक्षम करण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे.
ईमेल अलर्ट सेवेची सदस्यता घेऊ इच्छिणाऱ्या संस्था ra-upsc[at]gov[dot]in वर “सबस्क्रिप्शन रिक्वेस्ट – यूपीएससी रिक्रूटमेंट अलर्ट्स” या विषयासह विनंती पाठवू शकतात. अधिक माहिती आणि नवीनतम अपडेट्ससाठी, https://www.upsc.gov.in ला भेट द्या.