नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेला (आयआरएमएस) अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या (ईएसई 2025) कक्षेत अंतर्भूत करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला अनुसरून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) नवीन अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी 18 ऑक्टोबर 2024 ते 22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत नवीन ऍप्लिकेशन विंडो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने अर्जदार, ज्यांनी 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 दरम्यान अर्ज भरण्याच्या मूळ कालावधीत अर्ज भरला आहे, ते देखील परिशिष्टानुसार त्यामध्ये बदल करू शकतील. सर्व अर्जदारांना 23 नोव्हेंबर 2024 ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 7 दिवसांचा दुरुस्ती/संपादन कालावधी उपलब्ध केला जाईल, ज्यामध्ये ते आपले तपशील बदलू/संपादित करू शकतील.
18 सप्टेंबर 2024 ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ज्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे, त्यांनी पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, नवीन ऍप्लिकेशन विंडो दरम्यान ते आपल्या अर्जाचे तपशील अद्ययावत करू शकतील आणि आवश्यक असल्यास त्यामध्ये दुरुस्ती/संपादन करू शकतील.
अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ईएसई) 2025 देण्यासाठी इच्छुक उमेदवारांना परीक्षेची तयारी करायला पुरेसा वेळ मिळावा, यासाठी आयोगाने ईएसई (प्राथमिक) आणि ईएसई (मुख्य) परीक्षा, 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसई (प्राथमिक) 2025 आणि ईएसई (मुख्य) 2025 परीक्षा आता अनुक्रमे 8 जून 2025 आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी होतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वार्षिक परीक्षा कार्यक्रम 2025 अनुसार, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, 2025 (ईएसई, 2025) साठी 18 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख, 8 ऑक्टोबर 2024 असल्याचे नमूद करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात, सरकारने असा निर्णय घेतला, की भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेतील (आयआरएमएस) भरती, नागरी सेवा परीक्षा (वाहतूक, लेखा विभाग आणि कार्मिक उप-संवर्गासाठी) आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिग्नल व टेलिकम्युनिकेशन आणि स्टोअर्स उप-संवर्ग) या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून केली जाईल.
रेल्वे मंत्रालयाने देखील 9 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केले आहेत.अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ईएसई) 2025 साठी नियमांचे परिशिष्ट आणि नोटीस याबाबतची अधिक माहिती 18 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ईएसई) 2025 च्या परीक्षार्थींनी परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी ही माहिती वाचावी.