मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी)च्या वतीने नागरी सेवा प्रारंभिक परीक्षेसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. आयोगाने सिव्हील सेवा (प्रारंभिक) आणि भारतीय वन सेवा (प्रारंभिक) या परीक्षांसाठी 4 मार्च 2021 ला upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड केली आहे.
आयएएस, आयपीएस आदी प्रतिष्ठित सेवांसाठी एकूण 822 रिक्त जागांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा 27 जून 2021 ला होईल. युपीएससी आयएएस प्रिलिम्स 2021 ची अधिसूचना निघताच केंद्रीय सिव्हिल सेवा प्रारंभिक परीक्षेसाठी आनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. हे अर्ज upsconline.nic.in वरून करता येतील. युपीएससीने सिव्हील सेवा प्रारंभिक परीक्षेसाठी 24 मार्चपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे.
काय आहे निकष
या परीक्षेत सामील होण्यासाठी उमेदवारांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अनिवार्य आहे. सोबतच अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकणार आहेत. अर्थात या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपूर्वी पदवीच्या शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका अर्जासोबत अपलोड करावी लागणार आहे. याशिवाय उमेदवाराचे वय 1 आगस्ट 2021 ला 21 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नको. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 आगस्ट 1989 च्या पूर्वीचा व 1 आगस्ट 2000च्या नंतरचा नको. एससी, एसटी, ओबीसी आणि इतर उमेदवारांसाठी वयाच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना 6 संधी दिल्या जातील. ओबीसींना 9 संधी तर एससी, एसटीच्या उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे.